

‘आयआयटी’ने अधिष्ठात्यास हटविले
आधीच्या निवेदनाबद्दल माफी
मुंबई, ता. २१ : आयआयटी मुंबईतील एनर्जी सायन्स अँड इंजिनिअरिंग विभागातील द्वितीय वर्षाचा विद्यार्थी साहिल वाकोडे याच्या मृत्यूप्रकरणी सुरू असलेल्या चौकशीच्या पार्श्वभूमीवर संस्थेने प्रा. सूर्यनारायण दुल्ला यांना अधिष्ठाता (प्रशासकीय कामकाज) पदाच्या जबाबदारीतून तत्काळ मुक्त केले आहे. या प्रकरणातील पुढील कारवाई तपासाच्या निष्कर्षानंतर केली जाईल, असे आयआयटी मुंबईचे संचालक प्रा. शिरीष बी. केदारे यांनी विद्यार्थ्यांना पाठविलेल्या ई-मेलद्वारे स्पष्ट केले आहे.
प्रा. दुल्ला यांची अधिष्ठाता पदाची जबाबदारी काढून घेण्यात आली असली तरी ते संस्थेचे प्राध्यापक म्हणून कार्यरत राहणार आहेत. साहिलच्या मृत्यूच्या परिस्थितीबाबत संस्थेने यापूर्वी केलेल्या निवेदनातील काही उल्लेखांबद्दल आयआयटीने माफी मागितली आहे. मृत्यूच्या आधी नेमक्या कोणत्या घटना घडल्या आणि त्यांचा मृत्यूशी काय संबंध होता, याबाबत तपास अद्याप सुरू आहे. त्यामुळे तपास पूर्ण होण्यापूर्वी घटनांचे स्वरूप ठरविणे किंवा त्याबाबत निष्कर्ष काढणे योग्य नव्हते, असे संस्थेने नव्या निवेदनात म्हटले आहे.
१८ सप्टेंबरला मध्य सत्र परीक्षेदरम्यान साहिल मोबाईल फोन वापरताना आढळल्याचे आयआयटी मुंबईने सुरुवातीच्या निवेदनात म्हटले होते. त्याने परीक्षेची प्रश्नपत्रिका चॅटजीपीटीवर अपलोड करून उत्तरे मिळविण्याचा प्रयत्न केल्याचा दावाही संस्थेने केला होता. या घटनेनंतर संबंधित प्राध्यापक आणि विभागप्रमुखांनी साहिलशी चर्चा करून त्याचे समुपदेशन केले होते. तसेच या घटनेचा त्याच्या शैक्षणिक कारकिर्दीवर प्रतिकूल परिणाम होणार नाही, असे आश्वासन देण्यात आल्याचे संस्थेने म्हटले होते.
आयआयटी मुंबईने सुरुवातीला या प्रकरणात साहिलविरुद्ध कोणतीही शिस्तभंगाची कारवाई सुरू करण्यात आली नसल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, या दाव्यावर विद्यार्थ्यांच्या एका गटाने प्रश्न उपस्थित केले. काही विद्यार्थ्यांनी प्रा. दुल्ला यांनी साहिलला वर्षभराच्या निलंबनाची धमकी दिल्याचा आरोप केला. या आरोपामुळे संस्थेच्या सुरुवातीच्या निवेदनातील ‘कोणतीही शिस्तभंगाची कारवाई सुरू करण्यात आली नाही’ या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित झाले आहेत. या आरोपाची अधिकृत चौकशी सुरू आहे.
दरम्यान, साहिलच्या कुटुंबीयांनी त्याच्यावर जातीय भेदभाव आणि छळ झाल्याचा आरोप केला आहे. या पार्श्वभूमीवर पवई पोलिस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्यासंदर्भातील भारतीय न्याय संहितेच्या कलम १०८ अंतर्गत तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यातील संबंधित तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परीक्षेदरम्यान निरीक्षक म्हणून कार्यरत असलेले प्रा. सूर्यनारायण दुल्ला यांचे नाव या एफआयरमध्ये आहे.
...
प्रा. दुल्ला यांच्या समर्थनार्थ फॅकल्टी फोरम
आयआयटी मुंबईतील प्राध्यापकांनी सोमवारी दुसऱ्या वर्षाच्या विद्यार्थ्याच्या मृत्यूप्रकरणी न्याय मिळावा, या मागणीसाठी विद्यार्थी आणि कार्यकर्त्यांकडून सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रा. सूर्यनारायण दुल्ला यांच्या समर्थनार्थ भूमिका मांडली. सुमारे ७५० प्राध्यापकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आयआयटी मुंबईच्या फॅकल्टी फोरम या अधिकृत संस्थेने सोमवारी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात आपण प्रा. सूर्यनारायण दुल्ला यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे म्हटले आहे. प्रा. दुल्ला यांना आयआयटी मुंबईतून निलंबित करण्यात आलेले नाही आणि ते संस्थेचे प्राध्यापक म्हणून कार्यरत असल्याचे फोरमने स्पष्ट केले.
...
प्रतिष्ठित प्राध्यापक!
फॅकल्टी फोरमने पुढे म्हटले, की प्रा. दुल्ला हे एक प्रतिष्ठित प्राध्यापक असून, त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांच्या अभिप्रायाच्या आधारे अध्यापनातील उत्कृष्टतेसाठी मिळालेल्या दोन पुरस्कारांचाही समावेश आहे. अधिष्ठाता म्हणून कार्यरत असताना त्यांनी कॅम्पसमधील विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी अनेक उपक्रमांमध्ये सहभाग घेतल्याचेही फोरमने नमूद केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.