

प्रदूषणकारी ८८ बेकऱ्यांना पालिकेची अंतिम नोटीस
स्वच्छ इंधनाचा वापर करा अन्यथा बेकऱ्या सील करण्याचा इशारा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २२ : मुंबईतील वाढत्या हवेच्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी महापालिकेने आता अधिक आक्रमक भूमिका घेतली आहे. उच्च न्यायालयाने दिलेली मुदत संपल्यानंतरही लाकूड व कोळशाचा वापर सुरू ठेवणाऱ्या शहरातील ८८ बेकऱ्यांना पालिकेने अंतिम नोटीस बजावली आहे. पर्यावरणपूरक व स्वच्छ इंधनाचा वापर त्वरित सुरू न केल्यास संबंधित बेकऱ्या सील करून व्यवसाय बंद पाडण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
उच्च न्यायालयाने ८ जुलै २०२५ पर्यंत बेकऱ्यांना पर्यावरणपूरक इंधनावर स्थलांतरित होण्यासाठी अंतिम मुदत दिली होती व ती वाढवून देण्यास ठाम नकार दिला होता. या पार्श्वभूमीवर महापालिकेने मुंबई व उपनगरांमधील प्रदूषणकारी बेकऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.
पालिका अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत ५९२ बेकऱ्यांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. त्यापैकी ५०१ बेकऱ्यांनी जबाबदारी ओळखून पीएनजी, एलपीजी किंवा इलेक्ट्रिक ओव्हनचा वापर सुरू केला आहे, तर पाच बेकऱ्या पूर्णपणे बंद झाल्या आहेत, मात्र उर्वरित ८८ बेकऱ्यांनी अद्याप स्वच्छ इंधनाचा वापर करण्यासाठी कोणतीही प्राथमिक प्रक्रियाही सुरू केलेली नाही. त्यामुळे त्यांना अंतिम नोटीस पाठवण्यात आली आहे.
न्यायालयाचे आदेश आणि शहराच्या हवेची गुणवत्ता लक्षात घेता, पालिका प्रशासन आता कोणत्याही सवलतींच्या मनस्थितीत नाही. त्यामुळे या बेकऱ्यांसमोर आता स्वच्छ इंधनाचा स्वीकार करणे किंवा व्यवसाय कायमचा बंद करणे, हे दोनच पर्याय उरले आहेत.
लहान व्यावसायिकांची अडचण
बेकरी उद्योगात तंत्रज्ञान व इंधनात बदल करण्यासाठी १० ते २० लाख रुपयांचा मोठा खर्च येतो, असा दावा लहान बेकरीचालकांकडून केला जात आहे. तसेच, अनेक अरुंद गल्ल्यांमध्ये महानगर गॅस लिमिटेडची पाइपलाइन अद्याप पोहोचलेली नसल्याची अडचणही त्यांनी मांडली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.