पाच वर्षांनी मुंबईला दुसरी क्रूझ

पाच वर्षांनी मुंबईला दुसरी क्रूझ
Published on

पाच वर्षांनी मुंबईला दुसरे क्रूझ
‘कॉरडेलिया स्काय’ २३ ऑक्टोबरपासून सेवेत; गोवा, लक्षद्वीपसह आग्नेय आशियाची सफर
नितीन बिनेकर : सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २२ : मुंबईच्या क्रूझ पर्यटनाला तब्बल पाच वर्षांनी दुसऱ्या जहाजाची साथ मिळणार आहे. कॉरडेलिया क्रूझचे ‘कॉरडेलिया स्काय’ २३ ऑक्टोबरपासून मुंबईहून प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार असून, गोवा, लक्षद्वीपसह विविध समुद्री सफरींचे पर्याय उपलब्ध होणार आहेत. पुढील टप्प्यात याच जहाजातून फुकेत, लंगकावी, क्वालालंपूर आणि सिंगापूरपर्यंतचा प्रवास करता येणार आहे.
कॉरडेलिया क्रूझचे पहिले जहाज ‘एम्प्रेस’ सप्टेंबर २०२१मध्ये मुंबईहून सेवेत दाखल झाले होते. त्यापूर्वी हे जहाज ‘एम्प्रेस ऑफ द सीज’ या नावाने कार्यरत होते. १६ सप्टेंबर २०२१ला ‘एम्प्रेस’ने मुंबईहून पहिला प्रवास केला. आता पाच वर्षांच्या कालावधीनंतर कॉरडेलियाच्या ताफ्यात दुसरे जहाज दाखल होत आहे.

२,००४ प्रवाशांची क्षमता
‘कॉरडेलिया स्काय’ची लांबी २५८ मीटर असून, त्याचे वजन ७७ हजार १०४ ग्रॉस टन आहे. दोन प्रवाशांच्या ऑक्युपन्सीवर जहाजाची क्षमता दोन हजार चार प्रवाशांची आहे. जहाजावर एक हजार दोन स्टेटरूम्स आहेत. प्रवाशांसाठी १० डायनिंग व्हेन्यूज, ११ बार आणि लाउंज, दोन जलतरण तलाव आणि पाच हॉट टब आहेत. ३० हजार चौरस फुटांहून अधिक खुल्या डेकची जागा उपलब्ध आहे.

वीकेंडपासून लक्षद्वीपपर्यंत
मुंबईहून ‘कॉरडेलिया स्काय’च्या माध्यमातून दोन रात्रींची वीकेंड क्रूझ, तीन रात्रींची गोवा क्रूझ आणि चार रात्रींची लक्षद्वीप क्रूझ करता येणार आहे. गोवा आणि लक्षद्वीप या दोन्ही ठिकाणांचा समावेश असलेली पाच रात्रींची क्रूझही प्रस्तावित आहे.

पुढचा टप्पा आग्नेय आशिया
चेन्नईहून सात रात्रींच्या आग्नेय आशिया क्रूझचे नियोजन करण्यात आले आहे. या प्रवासात फुकेत, लंगकावी, क्वालालंपूर आणि सिंगापूरचा समावेश असेल. त्यामुळे देशांतर्गत प्रवासासोबत आंतरराष्ट्रीय समुद्री सफरीचा पर्यायही उपलब्ध होणार आहे.

मनोरंजनाचीही व्यवस्था
जहाजावर पिकलबॉल, सी क्रिकेट, जलतरण, गेमिंग आणि फिटनेसच्या सुविधा आहेत. लाइव्ह संगीत, विविध शो आणि कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. भारतीय प्रादेशिक खाद्यपदार्थांसह सुशी आणि इटालियन खाद्यपदार्थांचे पर्यायही उपलब्ध असतील. मुलांसाठी आणि किशोरवयीन प्रवाशांसाठी स्वतंत्र सुविधा, फिटनेस सेंटर आणि स्पाची व्यवस्थाही करण्यात आली आहे. कॉरडेलिया क्रूझच्या ताफ्यात सध्या ‘एम्प्रेस’ आणि ‘कॉरडेलिया स्काय’ ही दोन जहाजे असतील. २०२७ मध्ये ‘कॉरडेलिया सन’ ताफ्यात दाखल करण्याचे नियोजन आहे.

मुंबईच्या क्रूझ प्रवासातील टप्पे
- २०२१ - ‘एम्प्रेस’च्या माध्यमातून मुंबईहून क्रूझ सेवा सुरू
- १६ सप्टेंबर २०२१ - ‘एम्प्रेस’चा मुंबईहून पहिला प्रवास
- २०२६ - ‘कॉरडेलिया स्काय’ ताफ्यात दाखल
- २३ ऑक्टोबर २०२६ - ‘स्काय’चा मुंबईहून पहिला प्रवास
- २०२७ - ‘कॉरडेलिया सन’ दाखल करण्याचे नियोजन

कॉरडेलिया स्काय एका नजरेत
लांबी : २५८ मीटर
ग्रॉस टन : ७७,१०४
प्रवासी क्षमता : २,००४
स्टेटरूम्स : १,००२
डायनिंग व्हेन्यूज : १०
बार आणि लाउंज : ११
जलतरण तलाव : २
हॉट टब : ५
थिएटर : ९३० आसने

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com