झोपडी कारवाईने राजकीय पक्षांची कोंडी

झोपडी कारवाईने राजकीय पक्षांची कोंडी
Published on

झोपडी कारवाईने राजकीय पक्षांची कोंडी
१४ फुटांवरील बांधकामांवर १ ऑक्टोबरपासून मोहीम; झोपडीवासीयांमध्ये असंतोष
विष्णू सोनवणे ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २२ ः मुंबईतील १४ फुटांपेक्षा अधिक उंचीच्या झोपड्यांवर कारवाई करण्याच्या पालिकेच्या निर्णयामुळे मुंबईत राजकीय घमासान सुरू झाले असून, आता पालिका विरुद्ध झोपडीधारक असा असंतोष खदखदत आहे. सार्वत्रिक निवडणुकांमध्ये महत्त्वाची भूमिका असलेल्या राजकीय पक्षांच्या व्होट बँका असुरक्षित होणार असल्याने मुंबईच्या सर्व मतदारसंघांत पालिकेच्या ‘तोडक कारवाई’ चा राजकीय धुरळा उडू लागला आहे.
मुंबईत राहणाऱ्या लोकसंख्येच्या सुमारे ४१.८ टक्के लोक पालिकेच्या या कारवाईने भयभीत झाले आहेत. या झोपडपट्ट्यांमधील १४ फूट आणि त्यापेक्षा अधिक उंचीच्या अनधिकृत बांधकामांवर कारवाईसाठी १ ऑक्टोबरपासून विशेष मोहीम सुरू करण्यात येणार आहे. पालिकेच्या या कारवाईमुळे झोपडपट्ट्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
विरोधी पक्षांनी या निर्णयाला विरोध केला असून, अशा कारवाईमुळे मोठ्या प्रमाणात झोपडपट्टीतील नागरिक बेघर होण्याची भीती त्यांनी व्यक्त केले आहे. मुंबईतील ३९ हजारांहून अधिक झोपड्यांवर कारवाईचा निर्णय हा केवळ अतिक्रमणविरोधी मोहीम न राहता राजकीयदृष्ट्या संवेदनशील मुद्दा बनला आहे. आधी पुनर्वसन, मग कारवाई! अशी भूमिका विरोधकांनी घेतली आहे. काँग्रेस आणि समाजवादी पक्षाच्या नेत्यांनी विरोध दर्शविला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारवाईला स्थगिती द्यावी, अशी मागणीही केली आहे.

राजकीय पक्षांसमोर पेच
पालिकेची कारवाई प्रशासनाच्या दृष्टीने नियमानुसार असली, तरी झोपडपट्टी भागातील मोठ्या मतदारसंख्येमुळे राजकीय पक्षांसमोर दुहेरी कोंडी निर्माण होऊ शकते. एका बाजूला अनधिकृत बांधकामांवर कारवाईची भूमिका घ्यायची आणि दुसऱ्या बाजूला बाधित झोपडीधारकांचा रोष टाळायचा, अशी स्थिती राजकीय पक्षांपुढे निर्माण झाले आहे.

राजकीय वादाचा केंद्रबिंदू
स्थानिक पातळीवर लोकप्रतिनिधी, राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि झोपडीधारक यांच्यात बैठका सुरू झाल्या असून, या विषयावर विभागवार आंदोलने उभे राहण्याचे ही शक्यता आहे. कारवाईचा विस्तार वाढल्यास हा मुद्दा केवळ पालिका प्रशासनापुरता मर्यादित न राहता राजकीय वादाचा केंद्रबिंदू बनू शकतो.

मुंबईची लोकसंख्या : १ कोटी २४ लाख
झोपडपट्टीतील लोकसंख्या : ५२ लाख
झोपडपट्टीतील लोकसंख्येचे प्रमाण : ४१.८
कारवाईची शक्‍यता असलेल्‍या झोपड्या - ३९ हजार १११

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com