आरपीएफ कोठडीत तरुणाचा मृत्यू

आरपीएफ कोठडीत तरुणाचा मृत्यू
Published on

आरपीएफ कोठडीत तरुणाचा मृत्यू
नातेवाइकांचा मारहाणीचा आरोप; ‘सीआयडी’ चौकशी सुरू

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २२ : रोजगाराच्या शोधात मध्य प्रदेशातील खंडवा येथून मुंबईत आलेल्या इमरान शेख (३५) याचा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथील रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) चौकीतील कोठडीत मृत्यू झाला. या घटनेची चौकशी महाराष्ट्र पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) सोपविण्यात आली आहे. इमरानच्या नातेवाइकांनी आरपीएफ कर्मचाऱ्यांवर मारहाणीचा आरोप केला आहे. दरम्यान, रेल्वे प्रशासनाने इमरानची वागणूक असामान्य होती, असा दावा केला आहे. त्यामुळे शवविच्छेदन अहवाल आणि सीसीटीव्ही चित्रीकरणाच्या आधारे सीआयडीकडून तपास सुरू आहे.

इमरान दोन दिवसांपूर्वी रोजगाराच्या शोधात मुंबईत आला होता. २० सप्टेंबरला सकाळी सुमारे १०.१८ वाजता तो खंडव्याला जाणाऱ्या रेल्वेबाबत माहिती घेण्यासाठी सीएसएमटीतील आरपीएफ चौकीत गेला होता. याच वेळी तेथे वाद झाल्याचा आरोप त्याच्या नातेवाइकांनी केला आहे. नातेवाइकांच्या आरोपानुसार, वादानंतर आरपीएफ कर्मचाऱ्यांनी इमरानला मारहाण करून जखमी अवस्थेत कोठडीत ठेवले. मध्य रेल्वेच्या माहितीनुसार इमरानची वागणूक असामान्य होती. काही जण आपला जीव घेण्याचा प्रयत्न करीत असल्याचे तो सांगत होता. त्यानंतर त्याने आक्रमक होत आरपीएफचे उपनिरीक्षक अनिकेत यांच्यावर हल्ला केला. स्वतःला इजा होऊ नये म्हणून आरपीएफ जवानांनी त्याला ताब्यात घेतले आणि जीआरपीला माहिती दिली. त्यानंतर जीआरपीचे पाच कर्मचारी आरपीएफ चौकीत दाखल झाले. दरम्यान, दुपारी सुमारे १२.३० वाजता इमरानला शौचालयात जाण्याची परवानगी देण्यात आली. सुमारे १० मिनिटे तो बाहेर न आल्याने दरवाजा उघडण्यात आला. त्या वेळी तो बेशुद्धावस्थेत आढळला. त्याला तातडीने सेंट जॉर्ज रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी सीएसएमटी रेल्वे पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

सीसीटीव्हीच्या आधारे तपास
घटनेनंतर सीएसएमटी परिसरातील तसेच आरपीएफ कार्यालयातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासण्यात आले. इमरान पहाटेपासूनच स्थानक परिसरात फिरत असल्याचे चित्रीकरणात दिसून आले. त्याने रेल्वे पोलिस ठाणे आणि मदत कक्षालाही भेट दिल्याचे तपासात समोर आले आहे. हे सीसीटीव्ही चित्रीकरण सीआयडीच्या ताब्यात देण्यात आले असून, त्याची सखोल छाननी सुरू आहे. इमरानकडे कोणतेही ओळखपत्र किंवा मोबाइल फोन आढळला नाही. त्याच्याकडे दोन अनारक्षित रेल्वे तिकिटे आढळली आहेत. मुंबईतील त्याच्या हालचाली तसेच सीएसएमटीपर्यंत पोहोचण्याच्या घटनाक्रमाचाही तपास केला जात आहे.

शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा
इमरानच्या मृतदेहाचे जे. जे. रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले आहे. मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्यासाठी शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा आहे. सीआयडीच्या कोकण परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक प्रशांत वाघुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. इमरानच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com