

रंगभूमीकराची दरवाढ तूर्तास लांबणीवर
जुन्याच दराने आकारणी; नाटक, चित्रपटांना करमाफी कायम
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २२ : महापालिकेच्या कर निर्धारण व संकलन खात्यातर्फे दोन आर्थिक वर्षांसाठी मुंबईतील चित्रपटगृहे, नाट्यगृहे व इतर करमणूक प्रकारांवर जुन्याच (२०१४-२०१५ मधील) दराने रंगभूमीकर आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य शासनाकडून प्रस्तावित दरवाढीला अंतिम मंजुरी मिळेपर्यंत हीच व्यवस्था लागू राहणार आहे तसेच मराठी व गुजराती नाटके, एकपात्री प्रयोग, तमाशा आणि चित्रपटांना मिळणारी करमाफी आगामी वर्षातही कायम ठेवली जाणार आहे.
पालिकेने २०२६-२७ साठी रंगभूमीकरात वाढ करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारच्या नगरविकास विभागाकडे पाठवला आहे. या प्रस्तावित दरवाढीत मल्टिप्लेक्ससाठी प्रति खेळ ४०० रुपये, वातानुकूलित चित्रपटगृहांसाठी २०० रुपये, विना वातानुकूलित चित्रपटगृहांसाठी ९० रुपये तर नाटकांसाठी १०० रुपये कराची शिफारस आहे, मात्र शासनाची अधिसूचना प्रलंबित असल्याने २०२७-२८ मध्ये जुन्याच दराने (उदा. वातानुकूलित चित्रपटगृह रु. ६०, विनावातानूकुलित चित्रपटगृह ४५ व नाटके रु. २५) कर आकारणी होईल. सांस्कृतिक चळवळीला प्रोत्साहन देण्यासाठी मराठी व गुजराती नाटके, तमाशा व चित्रपटांना मिळणारी पूर्ण करमाफी २०२७-२८ मध्येही सुरू राहील. तसेच ५ तारखेपूर्वी आगाऊ कर भरणाऱ्यांना सहा टक्के सवलत कायम असेल. या प्रस्तावाला २० मार्च २०२७ पूर्वी पालिका मंजुरी आवश्यक आहे. दरम्यान, या दरवाढीवरून पालिकेत विरोध सुरू झाला आहे. विधी समिती अध्यक्षा दीक्षा कारकर म्हणाल्या, ‘नाट्यगृह व मल्टिप्लेक्सचे दर आधीच सामान्यांच्या आवाक्याबाहेर असल्याने करात वाढ करणे अयोग्य आहे.’ याप्रकरणी समिती सदस्य समृद्धी काते यांनी प्रस्ताव पुनर्विचारासाठी प्रशासनाकडे ‘रेफर बॅक’ करण्याची मागणी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.