

कामा रुग्णालयाच्या ‘ओपीडी’वर भार
सहा वर्षांत रुग्णसंख्येत सुमारे ६४ टक्क्यांची वाढ
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २२ : महिला आणि बालरुग्णांसाठी महत्त्वाचे असलेल्या कामा रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागावर (ओपीडी) गेल्या काही वर्षांत रुग्णसंख्येचा मोठा भार वाढला आहे. २०२० मध्ये ३४ हजार ९५५ असलेली ओपीडी रुग्णसंख्या २०२५ मध्ये ५७ हजार २९२ वर पोहोचली. म्हणजेच सहा वर्षांत तब्बल २२ हजार ३३७ रुग्णांची वाढ झाली असून, रुग्णसंख्येत सुमारे ६४ टक्के वाढ झाली आहे.
वाढत्या रुग्णसंख्येचे नियोजन करण्यासाठी रुग्णालय प्रशासनाने पायाभूत सुविधांसह विविध सुपरस्पेशालिटी सेवांचा विस्तार केला आहे. स्त्रीरोग ओपीडीचे नूतनीकरण व विस्तार करण्यात आला असून, स्वतंत्र मूत्र-स्त्रीरोग विभाग सुरू करण्यात आला आहे. यासाठी टाटा ट्रस्टकडून तीन कोटी रुपयांची आर्थिक मदत मिळाली आहे. कामा रुग्णालयात एप्रिल २०२४ पासून आयव्हीएफ आणि वंध्यत्व उपचारांची सुविधा सुरू करण्यात आली. सुरुवातीला आययूआय आणि बीजांडनिर्मितीला चालना देणारे उपचार सुरू करण्यात आले. त्यानंतर ही सेवा पूर्ण आयव्हीएफ सुविधेपर्यंत विस्तारित करण्यात आली. अवघ्या पाच महिन्यांत या विभागात ३७९ सल्लामसलती झाल्या. महिलांमधील गर्भाशय आणि अंडाशयाच्या कर्करोगावरील उपचारांसाठी स्त्रीरोग कर्करोग आणि किरणोपचार विभाग सुरू करण्यात आला आहे. ३८ कोटी रुपयांच्या लिनॅक यंत्रणेमुळे कर्करोगावरील उपचार रुग्णालयातच उपलब्ध झाले आहेत. उच्च जोखमीच्या गर्भधारणा आणि आनुवंशिक कर्करोगाच्या तपासणीसाठी एप्रिल २०२६ पासून जनुकीय समुपदेशन व जोखीम तपासणी केंद्र सुरू करण्यात आले आहे. कर्करोगग्रस्त रुग्णांसाठी उपशामक उपचार केंद्रही कार्यरत आहे.
गर्दी कमी करण्यासाठी डिजिटल सुविधा
ओपीडीतील वाढता भार लक्षात घेऊन अतिरिक्त निवासी डॉक्टरांची नियुक्ती, ओपीडी कक्षांचा विस्तार आणि विभागनिहाय ओपीडीची रचना करण्यात आली आहे. ऑनलाइन कागदविरहित नोंदणी, क्यूआर कोडद्वारे डिजिटल शुल्क भरणा आणि स्वतंत्र चौकशी कक्षामुळे रुग्णांचा प्रतीक्षाकाळ कमी करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. प्रसूतिपूर्व तपासणीची ओपीडीही दररोज सुरू करण्यात आली आहे.
वर्ष - ओपीडी संख्या
२०२० ३४,९५५
२०२१ ४६,३९६
२०२२ ५३,८४१
२०२३ ५४,७७५
२०२४ ५६,७९०
२०२५ ५७,२९२
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.