

गणेशोत्सवात बालसुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य
राज्य बालहक्क संरक्षण आयोगाचे पोलिस प्रशासनाला निर्देश
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २२ : गणेशोत्सवादरम्यान काळाचौकी येथे विजेचा धक्का लागून आठवर्षीय बालिकेचा झालेला मृत्यू आणि प्रमुख गणेश मंडळांमधील अलोट गर्दीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाने कडक भूमिका घेतली आहे. गर्दीच्या ठिकाणी कायदा व सुव्यवस्था तसेच बालकांच्या सुरक्षा आणि संरक्षणाच्या अनुषंगाने आयोगाने मंगळवारी (ता. २२) ऑनलाइन सुनावणी घेतली. या बैठकीस राज्यातील आठ पोलिस महानिरीक्षक कार्यालये आणि १२ पोलिस आयुक्तालयांतील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
सुनावणीदरम्यान आयोगाने स्पष्ट केले, ‘धार्मिक भावनांचा आदर राखत उत्सवाच्या काळात बालकांची सुरक्षा, संरक्षण आणि बालहक्क यांना सर्वोच्च प्राधान्य देणे गरजेचे आहे. मोठ्या गणेश मंडळांमध्ये विशेष बाल पोलिस पथक, महिला व दामिनी पथक तसेच अँटी-रोमिओ पथक दक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. महिला व बालकांवरील गुन्हे व छेडछाड रोखण्यासाठी सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित ठेवण्याचे निर्देश देण्यात आले.’ तासन्तास रांगेत उभे राहणाऱ्या बालकांसाठी पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, सावली आणि आपत्कालीन वैद्यकीय मदतीसाठी रुग्णवाहिका व बालरोगतज्ज्ञांची उपलब्धता ठेवण्याबाबत प्रशासनाने नियोजन करावे, असे आयोगाने स्पष्ट केले. तसेच उत्सवाच्या ठिकाणी लहान मुलांचा भिक्षावृत्ती किंवा खेळणी-फुगे विक्रीसारख्या बालमजुरीसाठी वापर होत असल्यास तत्काळ कायदेशीर कारवाई करून बालकांना बालकल्याण समितीसमोर हजर करण्याचे निर्देश देण्यात आले. आगामी दुर्गोत्सव बालस्नेही करण्यासाठी आतापासूनच नियोजन करण्याचे आवाहनही आयोगाने केले आहे.
उत्सवाचा आनंद लुटताना एकाही बालकाच्या जीवाला धोका निर्माण होणार नाही, याची दक्षता घेणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. काळाचौकी येथील घटना अत्यंत दुर्दैवी असून, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी बालसुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिलेच पाहिजे. गर्दीच्या मंडळांना परवानगी देताना बालकांसाठी मूलभूत सुविधा व सुरक्षेबाबत हमीपत्र घेण्याबाबत पुढील वर्षापासून विचार केला जाईल. आगामी दुर्गोत्सव पूर्णपणे बालस्नेही आणि सुरक्षित वातावरणात पार पाडण्यासाठी पोलिस प्रशासन व स्थानिक यंत्रणांनी समन्वयाने काम करावे.
- ॲड. संजय पुराणिक, अध्यक्ष, राज्य बालहक्क संरक्षण आयोग
..............
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.