

गर्भनिरोधकांपेक्षा समुपदेशनाची गरज
महाराष्ट्रातील गर्भपातांची संख्या सर्वाधिक
मुंबई, ता. २ : गर्भनिरोधक साधने उपलब्ध असूनही त्यांचा योग्य आणि नियमित वापर न झाल्यास अनियोजित गर्भधारणा टाळणे कठीण ठरते. त्यामुळे केवळ गर्भनिरोधक साधनांची उपलब्धता वाढविण्याबरोबरच योग्य पद्धतीची निवड, अचूक वापर, संभाव्य दुष्परिणाम आणि गरजेनुसार वैद्यकीय सल्ला याबाबत प्रभावी समुपदेशनाची गरज अधोरेखित झाली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आरोग्य व्यवस्थापन माहिती प्रणालीच्या २०२४-२५च्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात दोन लाख सात हजार १९ वैद्यकीय गर्भपातांची नोंद झाली आहे. देशातील विविध राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील ही संख्या सर्वाधिक आहे. मुंबई महापालिकेच्या कुटुंब कल्याण विभागाच्या माहितीनुसार, एप्रिल २०२४ ते मार्च २०२५ या कालावधीत मुंबईत २० हजार ९५० गर्भपात नोंदविण्यात आले. यामध्ये १९ वर्षांखालील मुलींच्या ७१६ प्रकरणांचा समावेश आहे. मुंबईतील २० हजार ६८५ प्रकरणांमध्ये कारणाची नोंद करण्यात आली होती. त्यापैकी १९ हजार ४९५ प्रकरणांमध्ये गर्भनिरोधकाचा अपुरा किंवा चुकीचा वापर अथवा गर्भनिरोधक पद्धतीचे अपयश हे कारण नमूद करण्यात आले आहे. या आकडेवारीचा अर्थ गर्भनिरोधक साधने मोठ्या प्रमाणावर अपयशी ठरली असा थेट काढता येत नाही. गर्भनिरोधकाची योग्य निवड, नियमित व अचूक वापर, वापरातील चुका टाळणे आणि अडचणी किंवा दुष्परिणाम जाणवल्यास वैद्यकीय सल्ला घेणे महत्त्वाचे आहे. गर्भनिरोधक वापराबाबत पती-पत्नीमध्ये मोकळा संवाद झाल्यास अधिक माहितीपूर्ण निर्णय घेता येऊ शकतो. महिलांप्रमाणे पुरुषांनीही कुटुंब नियोजनाची जबाबदारी स्वीकारण्याची गरज आहे. गर्भनिरोधक वापर आणि कुटुंब नियोजनात पुरुषांचा संवेदनशील सहभाग वाढला पाहिजे, असे तज्ज्ञांचे मत आहे.
...
राष्ट्रीय आकडेवारी अशी
राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण-६च्या २०२३-२४च्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रातील १५ ते ४९ वर्षे वयोगटातील विवाहित महिलांमध्ये कोणतीही कुटुंब नियोजन पद्धत वापरण्याचे प्रमाण ६९.१ टक्के, तर आधुनिक गर्भनिरोधक पद्धतींचा वापर ५२.७ टक्के आहे. कुटुंब नियोजनाची एकूण अपूर्ण गरज ८.५ टक्के आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.