

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ : भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयातील (राणीबाग) हम्बोल्ट पेंग्विनच्या वाढत्या संख्येमुळे प्रशासनाला त्यांच्या निवाऱ्याच्या विस्ताराचा निर्णय घ्यावा लागला आहे. सध्या राणीबागेतील पेंग्विनची संख्या २५ वर पोहोचली असून, विद्यमान पेंग्विन बंदिस्त कक्षाची (एन्क्लोजर) क्षमता पूर्ण झाली आहे. या पार्श्वभूमीवर पेंग्विन कक्षाचा सुमारे ३० चौरस मीटरने विस्तार करण्यात येणार असून, हे काम आगामी मार्च किंवा एप्रिलअखेरपर्यंत पूर्ण होण्याचा अंदाज आहे.
राणीबागेतील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, या विस्तारामुळे सध्याच्या २५ पेंग्विनना बागडण्यासाठी अधिक मोकळी जागा उपलब्ध होणार आहे. महत्त्वाचे म्हणजे, नव्या भागाच्या छतावर ‘ॲक्रेलिक’ बसवले जाणार आहे, ज्यामुळे पेंग्विनना नैसर्गिक व थेट सूर्यप्रकाश मिळू शकेल. सध्याच्या पेंग्विन कक्षामध्ये नियंत्रित तापमान, पाण्याचा साठा आणि विशेष वातावरण राखण्याची यंत्रणा असली, तरी थेट सूर्यप्रकाशाची सुविधा नव्हती. प्रशासनाने स्पष्ट केले की, हा विस्तार केवळ विद्यमान २५ पेंग्विनच्या सुलभ व्यवस्थापनासाठी व त्यांना अतिरिक्त जागा देण्यासाठी केला जात आहे. नव्याने कोणतेही पेंग्विन आणण्याचे नियोजन नाही.
राणीबागेत २०१६-१७ मध्ये दक्षिण कोरियातून आठ हम्बोल्ट पेंग्विन आणण्यात आले होते. ‘डोरी’ नावाच्या मादी पेंग्विनचा मृत्यू वगळता, यशस्वी प्रजननामुळे आज ही संख्या २५ वर पोहोचली आहे. पेंग्विन कक्षाची देखभाल, तांत्रिक यंत्रणा, तापमान नियंत्रण आणि पशुवैद्यकीय सेवा यांवर दरवर्षी सुमारे पाच ते ५.५ कोटी रुपये खर्च होत असल्याचे समोर आले आहे.
अन्य ठिकाणाहून मागणी नाही
पेंग्विनची संख्या वाढत असली तरी त्यांना दुसऱ्या प्राणिसंग्रहालयात हस्तांतरित करण्याबाबत अद्याप कोणत्याही प्राणिसंग्रहालयाकडून निश्चित मागणी किंवा प्रक्रिया सुरू झालेली नाही. त्यामुळे सध्या भायखळ्याच्या राणीबागेतच तापमान, जागा, सूर्यप्रकाश आणि देखभालीचा समतोल साधत पेंग्विनचे उत्तम व्यवस्थापन करण्यावर भर दिला जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.