विजय मल्याकडून ८,७५२ कोटींची वसुली बाकी

विजय मल्याकडून ८,७५२ कोटींची वसुली बाकी
Published on: 

विजय मल्ल्याकडून ८,७५२ कोटींची वसुली बाकी
‘एसबीआय’ची उच्च न्यायालयात माहिती
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ : फरारी आर्थिक गुन्हेगार विजय मल्ल्याकडून बँकांच्या समूहाला अद्याप ८,७५१.८६ कोटी रुपयांची वसुली बाकी असल्याची माहिती स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) नुकतीच उच्च न्यायालयात दिली. ‘किंगफिशर एअरलाईन्स’शी संबंधित मालमत्ता जप्त करण्याच्या निर्णयाला मल्याने दिलेल्या आव्हानाला विरोध करताना बँकेने प्रतिज्ञापत्राद्वारे ही माहिती सादर केली.

३१ ऑगस्ट २०२६पर्यंत कायदेशीर आणि अन्य खर्च वगळता मल्ल्याकडून उपरोक्त रक्कम येणे, अद्याप शिल्लक असल्याचे एसबीआयने म्हटले. बँकांकडून वसुलीची प्रक्रिया सुरू असून, अद्याप मोठी रक्कम वसूल होणे बाकी आहे. बँकांच्या समूहाने यापूर्वी १०,२६९.९६ कोटी रुपये तात्पुरत्या स्वरूपात वसूल केले होते. तसेच, कर्जवसुली न्यायाधिकरणात (डीआरटी) खटला दाखल करण्यापूर्वी ५४४.५८ कोटी रुपये वसूल झाले होते. सध्याच्या कायदेशीर प्रक्रियेचा भाग असलेले ५२,८४,९७८ समभाग अद्याप सुरक्षित असून, त्यांची विक्री झालेली नाही. आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) अर्जावर विशेष सत्र न्यायालयाने डिसेंबर २०१९ मध्ये मल्ल्याची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर बँकांच्या वसुलीला अडथळा निर्माण होत असल्याने बँकांनी न्यायालयात धाव घेतली. ३१ डिसेंबर २०१९ रोजी विशेष न्यायालयाने बँकांचा अर्ज मंजूर करून कायद्यानुसार वसुलीसाठी मालमत्ता उपलब्ध करून देण्यास परवानगी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com