स्वयंरोजगारासाठी महिलांना पिंक रिक्षा

स्वयंरोजगारासाठी महिलांना पिंक रिक्षा
Published on: 

स्वयंरोजगारासाठी महिलांना पिंक रिक्षा
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील पात्र महिलांना ९० ते १०० टक्के अनुदानाचा प्रस्ताव
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ५ : आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांना स्वयंरोजगाराच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी मुंबई महापालिकेच्या महिला व बालकल्याण योजनेंतर्गत पात्र महिलांना ९० ते १०० टक्के अनुदानावर पिंक इलेक्ट्रिक रिक्षा उपलब्ध करून देण्याचा ठराव महापालिकेच्या आगामी सभेत मांडण्यात येणार आहे. हा ठराव महिला व बालकल्याण योजनेत नव्याने समाविष्ट करावा, यासाठी भाजपने महापौरांकडे सादर केला आहे.
सध्या महापालिकेच्या महिला व बालकल्याण योजनेअंतर्गत पिवळे व केशरी रेशनकार्डधारक पात्र महिलांना शिवणयंत्रे, पिठाची गिरणी, ब्युटी पार्लर साहित्य, खाद्यपदार्थ निर्मितीची उपकरणे, संगणक तसेच इतर स्वयंरोजगारासाठी आवश्यक साहित्य अनुदान तत्त्वावर किंवा थेट आर्थिक सहाय्याद्वारे उपलब्ध करून दिले जाते. या योजनेमुळे अनेक महिलांनी स्वयंरोजगाराच्या माध्यमातून आर्थिक स्वावलंबन मिळविल्याचे ठरावात नमूद करण्यात आले आहे.
याच धर्तीवर महिलांसाठी रोजगाराच्या वाढत्या संधी लक्षात घेऊन पर्यावरणपूरक आणि शाश्वत वाहतूक पर्याय म्हणून पिंक इलेक्ट्रिक रिक्षा उपलब्ध करून देण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे. या योजनेमुळे महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाबरोबरच सुरक्षित, प्रदूषणमुक्त आणि पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेलाही चालना मिळेल, असा दावा ठरावात करण्यात आला आहे. हा प्रस्ताव अंतिम निर्णय होईपर्यंत महापालिकेच्या कार्यक्रम पत्रिकेवर कायम ठेवण्याची विनंतीही नगरसेविका मनीषा यादव यांनी केली आहे.

आयुक्तांनी सविस्तर अहवाल सादर करावा!
ठरावानुसार शासनाने निश्चित केलेल्या पात्रता, अटी व नियमांच्या अधीन राहून पात्र महिलांना ९० ते १०० टक्के अनुदानावर पिंक इलेक्ट्रिक रिक्षा देण्याची योजना सुरू करण्यात यावी. तसेच या योजनेसाठी आवश्यक निधी, अंमलबजावणीची कार्यपद्धती आणि लाभार्थी निवडीचे निकष निश्चित करण्याबाबत आयुक्तांनी सविस्तर अहवाल सादर करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com