

रक्तसाठा केंद्रांचा ‘एसबीटीसी’ घेणार आढावा
सहसंचालकांचे माहिती तीन दिवसांत सादर करण्याचे निर्देश
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ : राज्यातील रक्तसाठा केंद्रांची सद्यःस्थिती आणि त्यांच्या कामकाजाची माहिती संकलित करण्यासाठी राज्य रक्त संक्रमण परिषदेने जिल्हानिहाय माहिती मागविली आहे. यासंदर्भात राज्य रक्त संक्रमण परिषदेचे सहसंचालक डॉ. सुहास मोहनाळकर यांनी सर्व जिल्हा रक्त संक्रमण अधिकाऱ्यांना पत्र पाठवून संबंधित माहिती तातडीने सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
१ ऑक्टोबर २०२६ रोजी जारी करण्यात आलेल्या पत्रात कार्यक्षेत्रातील सर्व रक्तसाठा केंद्रांची माहिती विहित नमुन्यात सादर करण्यास सांगण्यात आले आहे. रक्तसाठा केंद्राचे नाव, संबंधित ‘मदर ब्लड सेंटर’, पत्ता, तालुका, जिल्हा, प्रभारीव्यक्तीचे नाव, संपर्क क्रमांक, ई-मेल तसेच केंद्र कार्यरत अथवा अकार्यरत असल्याची स्थिती आणि अकार्यरत असल्यास त्याची कारणे यांचा तपशील मागविण्यात आला आहे. डॉ. मोहनाळकर यांनी संबंधित माहिती एक्सेल शीटच्या माध्यमातून ‘एसबीटीसी’कडे सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. पत्र मिळाल्यापासून तीन दिवसांच्या आत ही माहिती कार्यालयाकडे सादर करण्यास सांगण्यात आले आहे. एखाद्या अधिकाऱ्याच्या कार्यक्षेत्रात रक्तसाठा केंद्र संलग्न नसल्यास त्याबाबतही कार्यालयास कळविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दरम्यान, राज्यातील रक्तसाठा केंद्रांच्या माध्यमातून रुग्णांना आवश्यक रक्तघटक वेळेत उपलब्ध होणे महत्त्वाचे आहे. काही ठिकाणी रक्तसंकलन, साठवणूक आणि वितरणाच्या प्रक्रियेबाबत प्रश्न उपस्थित होत असताना ‘एसबीटीसी’ने मागविलेल्या या माहितीमुळे राज्यातील रक्तसाठा केंद्रांचे प्रत्यक्ष चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
माहितीची सुसूत्रता
रक्तसाठा केंद्रांना संबंधित ‘मदर ब्लड सेंटर’कडून तपासणी केलेले रक्तघटक उपलब्ध करून दिले जातात. त्यामुळे कोणते रक्तसाठा केंद्र कोणत्या रक्तपेढीशी संलग्न आहे, त्यांची कार्यक्षमता काय आहे आणि कोणती केंद्रे अकार्यरत आहेत, याची माहिती प्रशासनाच्या दृष्टीने महत्त्वाची ठरणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.