

टीसींचा स्मार्ट लूक; जॅकेटचा प्रत्यक्ष वापर सुरू
एचएचटी, ईएफटीसह उपकरणांसाठी स्वतंत्र कप्पे; व्हिडिओ व्हायरल
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ : तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांचा नवा लूक सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल विभागाने तिकीट तपासणीसाठी तयार केलेल्या विशेष स्मार्ट जॅकेटचा प्रत्यक्ष वापर सुरू झाला असून, हे जॅकेट परिधान केलेल्या टीसीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. प्रायोगिक तत्त्वावर ३० जॅकेटचा वापर सुरू करण्यात आला आहे.
तिकीट तपासणी करताना कर्मचाऱ्यांना एचएचटी, ईएफटी, आवाजवर्धक उपकरण आणि हेडसेट यांसारखी साधने सोबत ठेवावी लागतात. ही उपकरणे सहज हाताळता यावीत आणि तपासणीदरम्यान कर्मचाऱ्यांच्या हालचालींना अडथळा येऊ नये, यासाठी जॅकेटची विशेष रचना करण्यात आली आहे.
नवीन जॅकेट परिधान केलेल्या टीसीचा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. जॅकेटवरील उपकरणांसाठी असलेले स्वतंत्र कप्पे आणि बदललेला गणवेश यामुळे या व्हिडिओकडे प्रवाशांचेही लक्ष वेधले जात आहे. पश्चिम रेल्वेने यापूर्वी ‘नमस्ते अभियान’अंतर्गत तिकीट तपासणी अधिक सौजन्यपूर्ण आणि पारदर्शक करण्यासाठी बॉडी-वॉर्न कॅमेऱ्यांचा प्रयोग केला होता. आता विशेष जॅकेटच्या वापरामुळे तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांच्या कामाला उपकरणांची सोय आणि व्यावसायिक स्वरूप देण्याचा प्रयत्न केला जात आहे.
जॅकेटमध्ये हँड हेल्ड टर्मिनल (एचएचटी), इलेक्ट्रॉनिक फेअर मशीन (ईएफटी) आणि आवाजवर्धक उपकरणासाठी स्वतंत्र खिसे देण्यात आले आहेत. हेडसेटसाठीही स्वतंत्र व्यवस्था आहे. त्यामुळे तपासणीदरम्यान उपकरणे हातात घेऊन किंवा वेगवेगळ्या ठिकाणी ठेवून काम करण्याची गरज कमी होणार आहे.
एसी लोकलमध्ये विशेष वापर
फोर्ट्रेस तिकीट तपासणी, वातानुकूलित लोकलमधील तपासणी, विशेष तिकीट तपासणी मोहिमा आणि गर्दीच्या वेळेत या जॅकेटचा वापर केला जात आहे. मुंबईच्या गर्दीच्या लोकलमध्ये प्रवाशांची तपासणी करताना कर्मचाऱ्यांना अधिक सहजपणे हालचाल करता यावी, हा त्यामागील प्रमुख उद्देश आहे. विशेषतः एसी लोकलमध्ये तिकीट तपासणीसाठी आवश्यक उपकरणे तातडीने उपलब्ध होणे महत्त्वाचे ठरते. जॅकेटमुळे ही उपकरणे कर्मचाऱ्यांच्या अंगावरच व्यवस्थित ठेवता येत असल्याने तपासणीची प्रक्रिया अधिक सुलभ होण्याची अपेक्षा आहे.
प्रयोगानंतर विस्ताराचा निर्णय
सध्या ३० जॅकेटचा प्रायोगिक वापर सुरू आहे. प्रत्यक्ष कामाच्या वेळी जॅकेट किती सोयीचे ठरते, उपकरणे हाताळताना होणारी धावपळ किती कमी होते आणि कर्मचाऱ्यांना त्याचा कितपत फायदा होतो, याचा आढावा घेतला जाणार आहे. या अनुभवाच्या आधारे भविष्यात अधिक तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांसाठी अशा जॅकेटचा वापर करण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.