शहरी आरोग्यासाठी स्वतंत्र आयुक्तालय

शहरी आरोग्यासाठी स्वतंत्र आयुक्तालय
Published on: 

शहरी आरोग्यासाठी स्वतंत्र आयुक्तालय
आरोग्य कार्यक्रमांवर राज्य स्तरावर देखरेख
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ : राज्यातील शहरांमधील आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने शासनाने स्वतंत्र शहरी आरोग्य आयुक्तालयाची प्रशासकीय यंत्रणा निश्चित केली आहे. त्यामुळे महापालिका, नगर परिषदा, नगर पंचायती तसेच कटक मंडळांच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध राष्ट्रीय आणि राज्य आरोग्य योजनांच्या अंमलबजावणीवर राज्य स्तरावर थेट देखरेख राहणार आहे.

नव्या व्यवस्थेनुसार संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरोग्य कार्यक्रमांच्या प्रगतीचा नियमित अहवाल ‘आयुक्त, शहरी आरोग्यसेवा तथा अभियान संचालक, राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, महाराष्ट्र’ यांच्याकडे सादर करावा लागणार आहे. त्यामुळे शहरांमध्ये सुरू असलेल्या आरोग्य योजनांच्या अंमलबजावणीला एकसंध प्रशासकीय चौकट मिळणार आहे. केंद्राच्या राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानाच्या मार्गदर्शक सूचनांसह राज्याचे शहरी आरोग्यविषयक धोरण राबविण्याची प्रमुख जबाबदारी या आयुक्तालयाकडे राहणार आहे. याशिवाय शहरी आरोग्य विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय बाबींवरही आयुक्तांना अधिकार देण्यात आले आहेत. रजा, वार्षिक वेतनवाढ, कार्यमूल्यांकन यांसारख्या बाबींचा त्यात समावेश आहे. यामुळे विविध शहरांमध्ये राबविण्यात येणाऱ्या आरोग्य योजनांची प्रगती, अंमलबजावणीतील अडचणी आणि आवश्यक उपाययोजनांचा राज्यस्तरावर नियमित आढावा घेणे शक्य होणार आहे.

कंत्राटी कर्मचाऱ्यांवरही नियंत्रण
शहरी आरोग्य विभागातील कंत्राटी आणि बाह्यस्रोत कर्मचाऱ्यांबाबतचे प्रशासकीय अधिकारही आयुक्तालयाकडे देण्यात आले आहेत. कर्मचाऱ्यांचे मानधन, कामाचे ठिकाण बदलणे आणि कार्यमूल्यांकन यासह संबंधित बाबींवर आयुक्तालयाचे नियंत्रण राहणार आहे. दरम्यान, स्वतंत्र आयुक्तालयाची पूर्ण प्रशासकीय रचना आणि नवीन लेखाशीर्ष अस्तित्वात येईपर्यंत त्याचा खर्च आरोग्यसेवा आयुक्तालयाच्या विद्यमान लेखाशीर्षातून भागविला जाणार आहे.

धोरणापासून अंमलबजावणीपर्यंत एकच यंत्रणा
राज्य सेवेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांचे वार्षिक मूल्यांकन तसेच कंत्राटी मनुष्यबळाच्या कार्यमूल्यांकनाची जबाबदारी कोणत्या स्तरावर राहणार, याचेही अधिकारक्षेत्र निश्चित करण्यात आले आहे. केंद्र व राज्याच्या शहरी आरोग्यविषयक योजनांची अंमलबजावणी, स्थानिक संस्थांशी समन्वय, मनुष्यबळाचे प्रशासकीय व्यवस्थापन आणि कार्यक्रमांचा आढावा या सर्व बाबींसाठी स्वतंत्र यंत्रणा उपलब्ध होणार आहे. या शहरी आरोग्य आयुक्तालयाचे मुख्यालय मुंबईत राहणार आहे.

स्वतंत्र आयुक्तालयामुळे प्रमुख बदल
आरोग्य योजनांवर थेट देखरेख
अहवाल देण्याची जबाबदारी
अधिकारी-कर्मचाऱ्यांचे प्रशासकीय नियंत्रण
कंत्राटी मनुष्यबळाचे व्यवस्थापन
धोरणांची एकसंध अंमलबजावणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com