

अनुपस्थित राहिल्यास वॉरंट बजावू
महापौरांना सत्र न्यायालयाचा इशारा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ : शिक्षकाला मारहाण केल्याच्या आरोपांशी संबंधित १० वर्षे जुन्या प्रकरणात सुनावणीला अनुपस्थित राहिल्याने महापौर रितू तावडे यांना सत्र न्यायालयाने बुधवारी (ता. ७) एक हजार रुपयांचा दंड ठोठावला. तसेच पुढील सुनावणीला अनुपस्थित राहिल्यास वॉरंट काढण्याचा आणि जामीन रद्द करण्याचा इशाराही न्यायालयाने दिला.
अतिरिक्त सत्र न्यायाधीश जी. जी. भन्साळी यांनी तावडे यांना दंडाची रक्कम आठवडाभरात जमा करण्याचे आदेश दिले. या प्रकरणात २०१७ मध्ये आरोपपत्र दाखल होऊनही अद्याप आरोप निश्चित झालेले नाहीत. आरोपींची वारंवार गैरहजेरी ही खटला लांबवण्याच्या वृत्तीचे निदर्शक असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. महापौरांचे वेळापत्रक व्यग्र असून, महापालिकेच्या विविध कार्यक्रमांमुळे त्यांना न्यायालयात उपस्थित राहणे शक्य नसल्याचे तावडेंकडून सांगण्यात आले. अन्य दोन आरोपींनीही त्यांच्या सामाजिक कार्यामुळे व्यग्र असल्याचे कारण देत वैयक्तिक उपस्थितीतून सूट मागितली. मात्र, अतिरिक्त सरकारी वकील इक्बाल सोलकर यांनी अर्जांना विरोध केला. त्याची दखल घेऊन पुढील सुनावणीला आरोप निश्चितीसाठी आरोपींनी प्रत्यक्ष हजर राहावे अन्यथा वॉरंट काढले जाईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले आणि सुनावणी २ नोव्हेंबरला ठेवली.
प्रकरण काय?
२९ जुलै २०१६ला वाकोलास्थित महापालिका शाळेत शिक्षकाच्या बदलीवरून वाद झाला होता. पोलिसांच्या आरोपानुसार, तत्कालीन नगरसेवक तावडे आणि अन्य सहा जणांनी व्यवस्थापनाशी वाद घालत दोन शिक्षकांवर हल्ला केला. याप्रकरणी ११ ऑगस्ट २०१६ला गुन्हा दाखल झाला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.