वरळी स्वच्छ म्हणजे मुंबई स्वच्छ नव्हे!

वरळी स्वच्छ म्हणजे मुंबई स्वच्छ नव्हे!
Published on: 

दक्षिण मुंबई स्वच्छ म्हणजे मुंबई स्वच्छ नव्हे!
उच्च न्यायालयाचे महापालिकेला खडे बोल

सकाळ वृत्तसेवा,

मुंबई, ता. ७ : मुंबईतील विशेषतः वरळी किंवा नरिमन पॉइंट हे दक्षिण मुंबईतील परिसर स्वच्छ आहेत. म्हणजे संपूर्ण मुंबई स्वच्छ झाली, असे म्हणता येणार नाही, अशा शब्दांत उच्च न्यायालयाने बुधवारी (ता. ७) मुंबई महापालिकेला खडे बोल सुनावले. त्याच वेळी मुंबईतील २४ प्रभागनिहाय आरोग्य व स्वच्छतेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले.

कांजूरमार्गस्थित कचराभूमीशी संबंधित याचिकांवर न्या. गिरीश कुलकर्णी आणि न्या. नीला गोखले यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू आहे. त्या वेळी खंडपीठाने रस्ते, पदपथ, मोकळ्या जागा आणि डोंगर उतारांवर कचरा टाकण्याचे प्रकार अद्यापही सुरू असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. जोगेश्वरी, मालाड परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा व अस्वच्छता असल्याचे स्वतः पाहिल्याचे न्यायालयाने नमूद केले. यासोबत जोगेश्वरी परिसर गंभीर समस्या बनला असून, राम मंदिर स्थानक परिसरातूनही अनेक तक्रारी येत असल्याचे न्यायालयाने नमूद केले. तसेच वरळी किंवा नरिमन पॉइंट हे दक्षिण मुंबईचे  परिसर स्वच्छ म्हणजे संपूर्ण मुंबई स्वच्छ होत नाही, याचा पुनरुच्चारही केला. सर्वोच्च न्यायालयातही याच समस्येशी संबंधित याचिका न्यायप्रविष्ट असल्याची माहिती महापालिकेकडून देण्यात आली. तसेच त्या आदेशांनुसार स्वच्छतेच्या प्रश्नावर देखरेख करण्यास मर्यादा असल्याचा दावाही पालिकेने केला, मात्र ‘मुंबईतील स्वच्छतेवर देखरेख करण्यास आम्हाला कोणताही प्रतिबंध नाही,’ असे स्पष्ट करत खंडपीठाने हा स्थानिक प्रशासनाचा विषय असल्याचे नमूद केले.


न्यायालयाचे आदेश
कचरा टाकण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी आवश्यक ठिकाणी यंत्रणा व बॅरिकेड्स उभारण्याचे आदेश न्यायालयाने दिले. के-वेस्ट, के-नॉर्थ, के-साऊथ तसेच मालाडमधील संबंधित अधिकाऱ्यांना बोलावून परिस्थितीचा आढावा घ्या, त्याच वेळी ‘केईएम’सह महापालिका व राज्य सरकारच्या रुग्णालयांत संसर्गजन्य आजार, डेंगी, मलेरिया, एच१एन१ आदींमुळे दाखल झालेल्या रुग्णांची आकडेवारी सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. तसेच सर्व २४ प्रभागातील स्वच्छता, आरोग्य आणि कचरा व्यवस्थापनासाठी केलेल्या उपाययोजनांचा प्रतिज्ञापत्राद्वारे तपशील सादर करण्याचे आदेश महापालिकेला देऊन सुनावणी २२ ऑक्टोबरला ठेवली.

कोणत्या योजना राबवल्या
२ ऑक्टोबर हा गांधी जयंती, लालबहादूर शास्त्री जयंती, स्वच्छता अभियान आणि जागतिक शांतता दिन या चार कारणांनी महत्त्वाचा असल्याचे न्यायालयाने नमूद केले. स्वच्छता अभियानाची सुरुवात याच दिवशी झाली. त्यामुळे त्यादिवशी महापालिकेने काय केले, कोणत्या योजना किंवा उपक्रम राबवले, याची माहिती सादर करण्याचे आदेश पालिकेला न्यायालयाने दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com