

बोरिवलीतील महापालिकेच्या केंद्रात ४९४ अस्थिमज्जा प्रत्यारोपण
थॅलेसेमिया, रक्तविकार आणि कर्करोगग्रस्त बालकांसाठी विनामूल्य उपचारांची सुविधा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १२ : बोरिवली (पूर्व) येथील पालिकेच्या सर्वसमावेशक थॅलेसेमिया उपचार, बालरक्तविकार, कर्करोग व अस्थिमज्जा प्रत्यारोपण केंद्रात सप्टेंबर २०२६ अखेरपर्यंत ४९४ अस्थिमज्जा प्रत्यारोपणे विनामूल्य करण्यात आली आहेत. थॅलेसेमिया आणि इतर गंभीर रक्तविकारांनी ग्रस्त बालरुग्णांना या केंद्रात विविध उपचारसुविधा उपलब्ध करून दिल्या जातात.
अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर) प्राजक्ता वर्मा लवंगारे यांनी केंद्राला भेट देऊन विविध विभागांच्या कामकाजाची माहिती घेतली. या वेळी त्यांनी थॅलेसेमिया, बालरक्तविकार आणि कर्करोगावरील उपचार, रक्तसंक्रमण सेवा, दिवसभराच्या उपचारांची सुविधा तसेच अस्थिमज्जा प्रत्यारोपण विभागाची पाहणी केली.
केंद्रातील उपचारांबाबत बोलताना लवंगारे यांनी, अस्थिमज्जा प्रत्यारोपणामुळे थॅलेसेमियाच्या रुग्णांना आजारातून मुक्त होण्याची संधी मिळते आणि अशा उपचारांमुळे बालकांना सामान्य जीवन जगण्यास मदत होते, असे नमूद केले.
आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना विनामूल्य उपचार
अस्थिमज्जा प्रत्यारोपणासाठी मोठा खर्च येत असल्याने आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांसमोर उपचारांचा खर्च पेलण्याचे आव्हान असते. महापालिकेच्या या केंद्रात पात्र बालरुग्णांना प्रत्यारोपणाची सुविधा विनामूल्य उपलब्ध करून दिली जाते. त्यामुळे आर्थिक अडचणींमुळे उपचार घेण्यात येणाऱ्या अडथळ्यांवर मात करण्यास मदत होते. केंद्रात थॅलेसेमिया आणि इतर रक्तविकारांचे निदान, नियमित रक्तसंक्रमण, दिवसभराच्या उपचारांची सुविधा, कर्करोगावरील उपचार तसेच अस्थिमज्जा प्रत्यारोपण अशा सेवा उपलब्ध आहेत. त्यामुळे दीर्घकालीन उपचारांची गरज असलेल्या रुग्णांना एकाच ठिकाणी विविध वैद्यकीय सेवा मिळतात.
अधिकाऱ्यांनी घेतली कामकाजाची माहिती
या भेटीदरम्यान आर-मध्य विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रफुल्ल तांबे, लोकमान्य टिळक सर्वसाधारण रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रमोद इंगळे, केंद्राच्या संचालिका डॉ. रत्ना शर्मा, उपसंचालक डॉ. संतोष खुडे तसेच वैद्यकीय, परिचारिका, तांत्रिक आणि प्रशासकीय विभागांतील कर्मचारी उपस्थित होते. ४९४ विनामूल्य अस्थिमज्जा प्रत्यारोपणांचा टप्पा पूर्ण झाल्याबद्दल लवंगारे यांनी केंद्रातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.