

जागतिक मानसिक आरोग्य दिन
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ : मानसिक आरोग्याच्या समस्यांबाबत मदत मागण्याची नागरिकांची तयारी वाढत असल्याचे चित्र राज्यातील ‘टेली-मानस’ हेल्पलाइनच्या आकडेवारीतून समोर आले आहे. ऑक्टोबर २०२२ मध्ये सुरू झालेल्या या मोफत चोवीस तास उपलब्ध सेवेला पहिल्या वर्षी १० हजार ७८ कॉल आले होते. २०२५-२६ मध्ये ही संख्या एक लाख ४३ हजार ७८७ वर पोहोचली. चार वर्षांत कॉलच्या संख्येत जवळपास १४ पट वाढ झाली असून, आतापर्यंत तीन लाख दोन हजार ७७८ कॉलची नोंद झाली आहे. जागतिक मानसिक आरोग्य दिनाच्या पार्श्वभूमीवर ही वाढ मानसिक आरोग्याविषयी वाढती जागरूकता दर्शवत असली, तरी मदत मागणाऱ्या नागरिकांना पुढील उपचार किती सहज उपलब्ध होतात, याकडेही लक्ष देण्याची गरज आहे.
नैराश्य, चिंता, कौटुंबिक समस्या, वैयक्तिक अडचणी आणि मानसिक ताणतणाव अशा विविध कारणांसाठी नागरिक या सेवेचा आधार घेतात. मोफत आणि गोपनीय समुपदेशनाची सुविधा असल्याने मानसिक त्रासाबाबत मदत मागण्याचा संकोच कमी होण्यास मदत होत आहे.
समुपदेशनानंतरच्या उपचारांचे काय?
हेल्पलाइनवरील वाढता प्रतिसाद ही सकारात्मक बाब असली तरी केवळ फोनवर समुपदेशन मिळणे पुरेसे नाही. मानसिक आरोग्याच्या समस्येची तीव्रता लक्षात घेऊन संबंधित व्यक्तीला आवश्यकतेनुसार मानसोपचार, समुपदेशन किंवा अन्य वैद्यकीय सेवांपर्यंत पोहोचवणे महत्त्वाचे आहे.
हेल्पलाइनवर संपर्क साधणाऱ्या नागरिकांपैकी किती जणांना पुढील उपचारांसाठी संदर्भित केले जाते, किती जण प्रत्यक्ष उपचार घेतात आणि त्यातील किती जण उपचार सुरू ठेवतात, याची माहितीही महत्त्वाची ठरते. वाढत्या गरजेनुसार तज्ज्ञांची उपलब्धता, उपचार केंद्रांची क्षमता आणि पाठपुरावा यंत्रणा यांचा आढावा घेण्याची आवश्यकता आहे.
राज्यात तीन केंद्रे; नागपुरातून मार्गदर्शन
राज्यात ठाणे येथील प्रादेशिक मनोरुग्णालय, पुणे येथील प्रादेशिक मनोरुग्णालय आणि अंबेजोगाई येथील वृद्धत्व आरोग्य व मानसिक आजार केंद्र येथे ‘टेली-मानस’ची तीन युनिट्स कार्यरत आहेत. नागपूर येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत मार्गदर्शन आणि प्रशिक्षणासाठी मेंटॉरिंग युनिट कार्यरत आहे. या यंत्रणेमार्फत नागरिकांना समुपदेशन आणि गरजेनुसार पुढील उपचारांसाठी मार्गदर्शन केले जाते.
कॉलची संख्या वाढल्यावरून ‘टेली-मानस’ उपक्रमाबाबत जागरूकता वाढल्याचे दिसते. अडचणीच्या वेळी या हेल्पलाइनवर बोलले पाहिजे, याची जाणीव नागरिकांमध्ये निर्माण होत आहे. या सेवेसाठी कार्यरत मानसशास्त्रज्ञांना नागपूरच्या एम्समध्ये प्रशिक्षण दिले जाते. मात्र, मानसिक समस्यांची तीव्रता लक्षात घेऊन संबंधित व्यक्तींना योग्य मार्गदर्शन आणि पुढील उपचार मिळणे आवश्यक आहे.
- डॉ. सुरेश पाटील, सदस्य, मानसिक आरोग्य महामंडळ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.