

शेअर रिक्षाचालकांची मनमानी सुरूच
अनधिकृत भाडेवाढीसह चार-पाच प्रवाशांची वाहतूक; प्रवाशांच्या खिशाला कात्री
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ : रेल्वे स्थानक असो किंवा बस स्थानकपासून इच्छित स्थळ दूर असल्याने अनेकांना रिक्षाचा पर्याय स्वीकारावा लागतो. याचाच गैरफायदा घेत शेअर रिक्षाचालक प्रवाशांची लूट करत आहेत. कोणतीही भाडेवाढ झाली नसताना शेअर रिक्षाचालकांनी अनधिकृतपणे आता दोन ते पाच रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे प्रवाशाकडून संताप व्यक्त केला जात आहे.
गोरेगाव रेल्वे स्थानकाबाहेर(पश्चिम) शेअर रिक्षा चालकांची गर्दी असते. दीड किमीपेक्षा कमी अंतर असेल तिथे २६ रुपये देऊन तीन जण प्रवास करू शकतात, पण शेअर रिक्षाचालक मीटर रिक्षा चालकांना थांबू देत नाहीत. त्यामुळे तीन जण सोबत प्रवास करत असल्यास त्यांना ३९ रुपये मोजावे लागतात.
बीकेसी येथे जाण्यासाठी कुर्ला आणि वांद्रे या दोन रेल्वे स्थानकांचा पर्याय आहे. या रेल्वे स्थानकात बाहेर शेअर रिक्षाचालक उभे असतात. कुर्ला येथून शेअर रिक्षाने बीकेसी येथे जाण्यासाठी ४० रुपये, वांद्रे रेल्वे स्थानकाबाहेरून बीकेसी येथे जाण्यासाठी २० रुपये शेअरिंग भाडे आकारले जाते, पण या शेअर रिक्षांमध्ये चार सीट भरल्या जातात.
कांजूरमार्ग परिसरात शेअर रिक्षांच्या दरात कोणतीही अधिकृत परवानगी न घेता १२ रुपयांऐवजी थेट १५ रुपये अद्याप आकारले जात आहेत. या वाढीमुळे स्थानिक प्रवाशांच्या खिशाला मोठी कात्री लागत आहे. पूर्वी शेअर रिक्षा दर फक्त १० रुपये होते. महागाईचे कारण देत रिक्षा संघटनेने १५ रुपये केले, तर चेंबूर कॅम्प ते वाशीनाका म्हाडा येथे शेअर रिक्षाने १० रुपये आकारले जातात, परंतु सकाळी बसला गर्दी असल्याने शेअर रिक्षाचालक १५ रुपये घेतात. नाइलाजाने प्रवाशांना तो पर्याय स्वीकारावा लागतो.
रिक्षातून केवळ तीनच प्रवासी नेणे हा अतिशय जुना आणि स्पष्ट नियम असून, चालकांना त्याचे पालन करणे बंधनकारकच आहे. सप्टेंबरपासून नवीन अधिकृत दर लागू झाले आहेत. कोणताही रिक्षाचालक निश्चित दरापेक्षा जास्त अतिरिक्त भाडे आकारत असेल, तर नागरिकांनी तक्रार करावी; संबंधित चालकावर कडक कारवाई केली जाईल, असे परिवहन विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले.
तीन प्रवासी नियमाचे उल्लंघन
शेअर रिक्षाला ५० टक्के भाडे जास्त असते, परंतु त्यासाठी तीन प्रवाशांची मर्यादा पालन करणे आवश्यक आहे. त्याकडे सर्रासपणे दुर्लक्ष केले जात आहे. काही रिक्षाचालक चार तर काही जण पाच प्रवासी घेत आहेत.
विशेष मोहीम राबविण्यात यावी
अंधेरी, जोगेश्वरी, वांद्रे, मालाड, कांदिवली, सांताक्रूझ, कुर्ला, मानखुर्द, चेंबूर, घाटकोपर आदी ठिकाणी रिक्षात पाच प्रवासी बसवले जातात. त्यामुळे चांगल्या रिक्षाचालकांचे नुकसान होत आहे. आरटीओ आणि वाहतूक पोलिसांनी याबाबत विशेष मोहीम राबवून कारवाई करायला हवी.
- के. के. तिवारी, अध्यक्ष भाजप रिक्षा टॅक्सी सेल
अनेक वर्षांपासून कांजुरमार्ग पूर्व ते कामगार आघाडी याठिकाणी शेअर रिक्षांचे भाडे प्रतिव्यक्ती १० रुपये आकारण्यात येत होते. रिक्षाचालकांनी कोणतीही सूचना न देता, थेट १५ रुपये आकारण्यास सुरुवात केली आहे.
- तान्हाजी मोरे , सामाजिक कार्यकर्ते
ठिकाण -पूर्वी -आताचे भाडे
गोरेगाव पश्चिम - १३- १५
सांताक्रूझ पूर्व - १० -१५
कुर्ला ते म्हाडा - ३० - ५०
चेंबूर कॅम्प ते वाशीनाका १० - १५
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.