

कामा रुग्णालयात मानसिक आरोग्य दिनानिमित्त व्याख्यान, पथनाट्य
तणाव व्यवस्थापन, मानसिक आरोग्याविषयी गैरसमज दूर करण्यावर भर
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त कामा अँड अल्ब्लेस रुग्णालयात व्याख्यान, पथनाट्य आणि विविध सहभागात्मक उपक्रमांच्या माध्यमातून मानसिक आरोग्याविषयी जनजागृती करण्यात आली.
दैनंदिन जीवनातील तणाव ओळखणे, त्याचे व्यवस्थापन करणे आणि मानसिक आरोग्याच्या समस्यांकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहणे, या विषयांवर कार्यक्रमात मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी ‘स्वतःच्या मानसिक आरोग्याची गुरुकिल्ली स्वतःच्या हातात’ या विषयावर व्याख्यान झाले. रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. तुषार पालवे आणि अधिसेविका निरुपमा डोंगरे यांनी तणावाचा सामना करण्याच्या विविध उपायांबाबत माहिती दिली. स्वतःसाठी वेळ काढणे, सकारात्मक विचारसरणी जोपासणे आणि दैनंदिन जीवनात आरोग्यदायी सवयी अंगीकारणे यांचे महत्त्व त्यांनी स्पष्ट केले.
मानसिक आरोग्याशी संबंधित प्रश्न केवळ वैयक्तिक पातळीवर न ठेवता त्याविषयी मोकळेपणाने संवाद साधण्याची गरज पथनाट्यातून मांडण्यात आली. मानसिक तणाव आणि भावनिक समस्यांबाबत समाजात असलेले गैरसमज दूर करणे, तसेच गरज पडल्यास तज्ज्ञांची मदत घेणे, हा या सादरीकरणाचा मुख्य आशय होता.
कार्यक्रमात आयोजित विविध सहभागात्मक उपक्रमांतून तणाव कमी करण्याचे मार्ग, भावनिक संतुलन राखण्याचे महत्त्व आणि सकारात्मक दृष्टिकोन विकसित करण्याबाबत माहिती देण्यात आली.
या कार्यक्रमाच्या आयोजनात मनोरुग्ण परिसेविका प्रियाली गावडे, ज्योती देशमुख तसेच अधिपरिचारिका आरती धरणे, सविता चौधरी आणि स्वरा केळुसकर यांनी सहभाग घेतला. शारीरिक आरोग्याप्रमाणेच मानसिक आरोग्याकडेही लक्ष देणे आवश्यक असून, मानसिक अडचणी जाणवल्यास त्याबाबत बोलणे आणि योग्य मदत घेणे महत्त्वाचे आहे, हा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.