मुंबईतील रस्ते धुण्यास विरोध

मुंबईतील रस्ते धुण्यास विरोध
Published on: 

मुंबईतील रस्ते धुण्यास विरोध
स्थायी समितीने प्रस्ताव फेटाळला
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ : मुंबईत निवासी क्षेत्रात १० टक्के तर व्यावसायिक क्षेत्रासाठी २० टक्के पाणीकपात लागू असताना पालिका प्रशासनाचा मुंबईतील प्रदूषण कमी करण्यासाठी टँकरच्या साह्याने पाण्याने रस्ते धुण्याचा प्रस्ताव स्थायी समितीत सत्ताधारी तसेच विरोधी पक्षांनी एकमताने फेटाळला.

मुंबईत पाणी समस्या भेडसावत असताना रस्ते पाण्याने धुणे चुकीचे ठरेल. त्यामुळे रस्ते पाण्याने धुण्याचा प्रस्ताव रेकॉर्ड करावा, अशी मागणी पालिका सभागृहनेते गणेश खणकर यांनी केली. तर शिवसेनेचे गटनेते अमेय घोले यांनी राज्यातील अनेक तालुक्यांत दुष्काळी परिस्थिती असताना मुंबईत मात्र रस्ते पाण्याने धुतल्यास शेतकऱ्यांची थट्टा केल्यासारखे होईल, असे सांगत गणेश खणकर यांच्या मागणीला पाठिंबा दिला. त्याचप्रमाणे पाण्याची बिकट स्थिती असताना असा हास्यास्पद प्रस्ताव तयार करणाऱ्या संबंधित पालिका अधिकाऱ्याचा सत्कार करण्यात यावा, अशी उपरोधिक टीकाही घोले यांनी केली. शहरातील रस्ते धुण्यासाठी जेटिंग व्यवस्थेसह पाण्याचे टँकर १५० दिवसांसाठी भाडेतत्त्वावर पुरवठा करण्याबाबतचा प्रस्ताव घनकचरा व्यवस्थापन खात्याचे प्रमुख अभियंता यांच्यावतीने स्थायी समितीच्या बैठकीत शुक्रवारी (ता. ९) मंजुरीसाठी सादर करण्यात आला. त्यावर सभागृह नेते गणेश खणकर यांच्यासह सर्वपक्षीय गटनेते, नगरसेवकांनी जोरदार आक्षेप घेत विरोध दर्शविला.

अध्यक्षांचा नाराजी
स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी नाराजी व्यक्त करीत मुंबईतील धुळीचे प्रदूषण कमी करण्यासाठी इमारत बांधकामे करणाऱ्या संबंधित विकसकांवर काही प्रमाणात जबाबदारी टाकू शकतो का ते पाहावे, असे सांगत हा प्रस्ताव रेकॉर्ड केला. मनसेचे गटनेते यशवंत किल्लेदार यांनी मुंबईत पाणी समस्या असताना पालिकेने पाणी वितरणाबाबत स्वतंत्र आराखडा तयार करणे आवश्यक असल्याचे सांगितले. शिवसेनेच्या नगरसेविका यामिनी जाधव, भाजपचे नगरसेवक तेजिंदर तिवाना यांनीही या प्रस्तावाला विरोध केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com