

पाणीटंचाईवर तातडीने उपाययोजना करा
विरोधी पक्षनेत्या पेडणेकर यांची मागणी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १२ ः पाण्याची गळती आणि अनधिकृत वापर रोखून बांधकामांसाठी होणाऱ्या पाण्याच्या वापरावर नियंत्रण, बंद पडलेल्या विहिरींचे पुनरुज्जीवन तसेच उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर, यावर प्रशासनाने तातडीने नियोजन करावे, अशी मागणी मुंबई महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी किशोर पेडणेकर यांनी पालिका प्रशासनाकडे केली आहे.
महापौरांच्या माध्यमातून तलावांची पाहणी केली असता, मोठ्या प्रमाणावर बाष्पीभवन होत असल्याचे निदर्शनास आले. पावसाचे प्रमाण कमी असल्याने आणि तलावांतील पाण्याची पातळी घटत असल्याने भविष्यात पाणीपुरवठ्याचे नियोजन अधिक काळजीपूर्वक करणे गरजेचे आहे. सध्या काही भागांत १० टक्के पाणीकपात लागू असल्याचे सांगितले जात असले, तरी काही विभागांमध्ये ही कपात १५ ते १८ टक्क्यांपर्यंत जाण्याची शक्यता असल्याचेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे मुंबईकरांना पाणीपुरवठ्याबाबत स्पष्ट माहिती देणे आवश्यक आहे, असे पेडणेकर यांनी व्यक्त केले आहे.
गळती, पाणीचोरी नियंत्रण आणा
पाण्याचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा असताना पाण्याची गळती, अनधिकृत वापर आणि अनावश्यक व्यावसायिक वापर रोखणे आवश्यक आहे. जानेवारीनंतर बांधकामांसाठी पाणीपुरवठा थांबविण्याबाबत करण्यात आलेल्या नियोजनाची प्रभावी अंमलबजावणी करावी. बांधकामांसाठी पिण्यायोग्य पाण्याचा वापर टाळून पर्यायी स्रोतांचा वापर करण्यास प्राधान्य द्यावे. मुंबईतील अनेक ठिकाणी पूर्वी अस्तित्वात असलेल्या विहिरी बुजविण्यात आल्या आहेत. अशा विहिरींचा शोध घेऊन त्यांचे पुनरुज्जीवन करावे. विहिरींतील पाण्याची तपासणी करून ते योग्य प्रक्रियेनंतर पिण्यायोग्य करता येईल का, याची चाचपणी करावी. तसेच बोअरवेलसाठी परवानगी मागणाऱ्या सोसायट्यांच्या प्रस्तावांवर योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणीही विरोधी पक्षनेत्या पेडणेकर यांनी केली.
टँकरमाफियांना रोख
पाणीटंचाईच्या काळात टँकरच्या पाण्याची मागणी वाढण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत टँकरचालकांनी नागरिकांकडून अवाजवी दर आकारून त्यांची आर्थिक लूट करू नये. प्रशासनाने टँकरच्या दरांवर, पाणीपुरवठ्याच्या पद्धतीवर आणि नागरिकांच्या तक्रारींवर लक्ष ठेवावे. गरजू नागरिकांना वाजवी दरात पाणी उपलब्ध होईल, याची दक्षता घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.