

धरणांतील गाळावरून राजकीय एकजूट
गाळ काढण्याच्या प्रस्तावावर प्रशासनाचा नकारात्मक अभिप्राय; सर्वपक्षीय नगरसेवकांची नाराजी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ ः मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधून पाच ते दहा वर्षांतून एकदा गाळ काढण्यात यावा, अशी मागणी स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे केली होती. मात्र पालिका प्रशासनाने त्यावर नकारात्मक अभिप्राय दिल्याने स्थायी समितीच्या बैठकीत सर्वपक्षीय गटनेते, नगरसेवकांनी नाराजी व्यक्त करीत धरणांमधून गाळ काढण्याची आग्रही मागणी लावून धरीत प्रशासनाचा अभिप्राय परत पाठवण्याचा निर्णय घेतला.
मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणलोट क्षेत्रांमध्ये डोंगरदऱ्यांमधून येणाऱ्या पाण्यासोबत माती, पालापाचोळा, कचरा वाहत येतो. परिणामी, धरणांतील पाणी साठवण्याची क्षमता कमी होत आहे. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये मुंबई शहराला पुरेसा पाणीपुरवठा करणे महापालिकेला कठीण होते आणि ह्याकरिता मुंबई शहरासाठी नवीन धरणांचे बांधकाम करणे हीदेखील खूपच खर्चीक बाब आहे. मुंबई शहराला दररोज ४,१०० दशलक्ष लिटर आणि वर्षभरासाठी १४,४७,३४७ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करणाऱ्या अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी धरण क्षेत्रांतील गाळ पावसाळ्यापूर्वी किमान पाच ते दहा वर्षांतून एकदा काढावा, अशी मागणी भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक तथा स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे केली होती.
स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी आला असता शिवसेना ठाकरे गटाचे ज्येष्ठ नगरसेवक यशोधर फणसे यांनी प्रशासनाने घाईघाईने उत्तर दिले असून, खरेतर धरणांमधील पाणीसाठवण क्षमता वाढविण्यासाठी गाळ काढणे आवश्यक असल्याचे सांगत प्रशासनाच्या नकारात्मक उत्तरावर नाराजी व्यक्त केली. त्यावर सभागृह नेते गणेश खणकर यांनी काही ठरावीक कालावधीने धरणांमधील गाळ काढणे बंधनकारक करण्यात यावे, अशी मागणी केली. सर्वपक्षीय गटनेते आणि सदस्यांनी तलावातील गाळ काढण्याबाबत आग्रही भूमिका मांडली.
दैनंदिन निरीक्षणाची गरज
या ठरावाला सर्वपक्षीय नगरसेवकांनी मंजुरी दिली. मात्र महापालिका आयुक्त यांनी या ठरावावर नकारात्मक उत्तर दिले. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये गाळाचे प्रमाण अत्यंत कमी असून, त्याचा पाणीसाठवण क्षमतेवर कोणताही विपरित परिणाम झालेला नाही. तसेच धरणांमध्ये वार्षिक नाममात्र सुमारे ०.२ टक्केपर्यंत पाणी साठवण क्षमतेमध्ये घट झाली आहे. त्यामुळे या धरणांमधून गाळ काढण्याची आवश्यकता नसून, दैनंदिन निरीक्षणाची गरज असल्याचे सांगत महापालिका प्रशासनाने आपले हात वर केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.