

‘जेन-झी’ फेलोशिप निकालावरून वाद
गुण, गुणवत्ता क्रमवारी गुलदस्त्यात; किशोरी पेडणेकरांचे आयुक्तांना पत्र
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० : महापालिकेच्या बहुचर्चित ‘जेन-झी फेलोशिप’ परीक्षेचा निकाल जाहीर करताना विद्यार्थ्यांचे गुण, टक्केवारी किंवा कट-ऑफ जाहीर न करता थेट १५० विद्यार्थ्यांची नावे प्रसिद्ध केल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. या अपारदर्शक कारभारावर आक्रमक होत पालिकेच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी पालिका आयुक्तांना पत्र लिहिले आहे.
‘‘निवड प्रक्रिया कोणत्या निकषांवर झाली याची माहिती प्रशासनाने तात्काळ जाहीर करावी अन्यथा विद्यार्थ्यांमध्ये प्रशासनाविरोधात अविश्वास निर्माण होऊन पालिकेची प्रतिष्ठा मलिन होईल,’’ असा इशारा पेडणेकर यांनी दिला. तसेच या मुद्द्यावरून आगामी महासभेत प्रशासनाला धारेवर धरण्याचा इशाराही त्यांनी दिला. महाराष्ट्र शासनाच्या ‘सीएम फेलोशिप’च्या धर्तीवर महापालिकेने तरुण पिढीसाठी ‘बीएमसी जेन झी फेलोशिप प्रोग्राम’ सुरू केला आहे. विकसित मुंबईच्या उभारणीत तरुणांचा सहभाग वाढवणे आणि त्यांना प्रशासकीय कामाचा अनुभव देणे, हा यामागचा हेतू आहे. या उपक्रमासाठी हजारो तरुणांनी अर्ज केले होते आणि पहिल्या टप्प्यात सुमारे १,५०० विद्यार्थी लेखी परीक्षेला बसले होते.
दरम्यान, पालिकेने संकेतस्थळावर केवळ १५० यशस्वी विद्यार्थ्यांची यादी प्रसिद्ध केली. धक्कादायक बाब म्हणजे या यादीत कोणत्याही विद्यार्थ्याचे गुण, गुणवत्ता क्रमवारी किंवा टक्केवारी नमूद केलेली नाही. या परीक्षेसाठी प्रत्येक विद्यार्थ्याकडून ५०० रुपये प्रवेश शुल्क आकारण्यात आले होते; तरीही अपात्र ठरलेल्या १,३०० हून अधिक विद्यार्थ्यांना त्यांचे गुणपत्रक देण्यात आलेले नाही. पैसे भरूनही स्वतःची कामगिरी जाणून घेण्यापासून वंचित ठेवल्याने परीक्षार्थींमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. प्रशासनाच्या या कारभारामुळे उपक्रमाच्या पहिल्याच टप्प्यात पारदर्शकतेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. दरम्यान, ‘‘पालिकेने कोणत्या निकषांनुसार ही यादी जाहीर केली आहे, याची संपूर्ण माहिती प्रशासनाकडून घेऊनच यावर भाष्य केले जाईल,’’ अशी भूमिका सभागृह नेते गणेश खणकर यांनी घेतली.
.....................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.