

तुषार गांधी यांची आठ तासांनंतर सुटका
डी. एन. नगर पोलिस ठाण्याला शिवसैनिकांचा घेराव
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० : सीजेपीच्या आंदाेलनाला पाठिंबा देण्यासाठी ऑगस्ट क्रांती मैदानाकडे जाण्यापूर्वीच महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांना मुंबई पोलिसांनी शनिवारी पाठलाग करून ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना अज्ञातस्थळी ठेवल्याने शिवसेनेचे (ठाकरे गट) नेत्यांनी अंधेरीच्या डी. एन. नगर पोलिस ठाण्यातच ठाण मांडले. या वेळी शिवसैनिक माेठ्या प्रमाणावर जमून, पाेलिस ठाण्याला घेराव घातला. या वाढत्या तणावानंतर अखेर आठ तासांनंतर बोरिवली पोलिसांनी तुषार गांधी यांची सुटका केली. सुटकेनंतर गांधी यांनी ‘पोलिस सत्ताधाऱ्यांचे गुलाम झाले असून, हे युवकच मोदींची सत्ता उलथवून टाकतील,’ असा इशारा दिला.
सामाजिक कार्यकर्ते तुषार गांधी यांच्या ‘हम भारत के लोग’ या संघटनने सीजेपीच्या दिल्ली आंदोलनाला समर्थन देण्यासाठी दुपारी ३.३०च्या सुमारास मुंबईच्या ऑगस्ट क्रांती मैदानावर जमण्याचे आवाहन केले होते. सकाळी मुंबई विमानतळावर उतरल्यानंतर तुषार गांधी यांचा पोलिसांनी पाठलाग करून वांद्रे येथून त्यांना ताब्यात घेतले. तुषार गांधी यांनी व्हिडिओद्वारे पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती दिली. त्यांना नेमक्या कुठल्या पोलिस ठाण्यात नेले याचा कुणालाच पत्ता नव्हता. या वृत्तानंतर शिवसेना (ठाकरे गट) नेते आदित्य ठाकरे, संजय राऊत, अनिल परब, स्थानिक आमदार हारून खान यांनी डी. एन. नगर पोलिस ठाण्यात पोहोचून तेथे ठाण मांडले. त्यांच्यासोबत आजूबाजूच्या भागांतील शिवसैनिक मोठ्या प्रमाणात पोलिस ठाण्याच्या बाहेर जमले होते. गांधींना कुठे ठेवले आहे, त्यांच्याशी भेटू द्या आणि त्यांची सुटका होईपर्यंत येथून हलणार नाही, असा पवित्रा या नेत्यांनी घेतला. या वेळी शिवसैनिकांनी जाेरदार घोषणाबाजीही केली.
==
वांद्रे येथील नॅशनल कॉलेजजवळून मला पोलिसांनी ताब्यात घेतले. आठ तासांनंतर माझी सुटका झाली आहे. पोलिस सत्ताधाऱ्यांचे गुलाम झालेत. एक दिवस हे युवक मोदींची सत्ता उलथवून टाकतील.
- तुषार गांधी, सामाजिक कार्यकर्ते
...
आम्ही सर्व जण तुषार गांधींना पाठिंबा देण्यासाठी येत आहोत, हे लक्षात येताच पोलिसांनी गुपचूप त्यांना दुसऱ्या पोलिस ठाण्यात हलवले. या सरकारच्या मनात नागरिकांबद्दल एवढी भीती आहे.
- आदित्य ठाकरे, नेते, शिवसेना
==
तुषार गांधी यांना डी. एन. नगर पोलिस ठाण्यात ठेवण्यात आले होते. आम्ही त्यांची भेट घेण्यासाठी गेलो होतो; मात्र पोलिसांनी त्यांना अज्ञातस्थळी हलवले. ही गुप्तता कशासाठी? पोलिस ठाण्यात ठिय्या आंदोलन केल्यानंतर तुषार गांधी यांची आठ तासांनंतर सुटका केली.
- संजय राऊत, प्रवक्ता, शिवसेना
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.