

म्हाडाच्या गृहनिर्माण प्रकल्पांवर आता ऑनलाइन वॉच!
प्रकल्पाच्या मंजुरीपासून ते ओसीपर्यंतची अद्ययावत माहिती संकेतस्थळावर टाकणार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी गृहनिर्माण प्रकल्प वेळेत पूर्ण व्हावेत म्हणून म्हाडाने कंबर कसली आहे. त्यानुसार प्रकल्पाला मंजुरी मिळाल्यापासून ते भोगवटा प्रमाणपत्र (ओसी) मिळेपर्यंतच्या संपूर्ण प्रक्रियेवर ऑनलाइन वाॅच ठेवला जाणार आहे. कोणत्या प्रकल्पाचे किती काम झाले आहे, परवानग्या कोणत्या टप्प्यावर आहेत याबाबतची इत्थंभूत माहिती वेळोवेळी वेबसाईटवर अद्ययावत केली जाणार आहे. त्यामुळे विलंब होत असलेल्या प्रकल्पाच्या मार्गातील अडथळे दूर करण्याबाबत कार्यवाही करणे शक्य होणार आहे.
म्हाडाच्या राज्यभरात कार्यक्षेत असून, सात मंडळे आणि दोन विशेष उद्देश मंडळे कार्यरत आहेत. त्यांच्याकडून आपल्या कार्यक्षेत्रात वेगवगेळे गृहनिर्माण प्रकल्प हाती घेतले जात असून, त्यामध्ये तयार होणाऱ्या घरांची लाॅटरीच्या माध्यमातून विक्री केली जात आहे. त्याला नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे, मात्र अनेकदा परवानग्यांना विलंब झाल्याने किंवा अन्य तांत्रिक कारणांमुळे प्रकल्प लटकतात. त्याची एका ठिकाणी माहिती नसल्याने त्यावर उपाययोजना करण्यास वेळ लागतो. त्याची दखल घेत यापुढे हाती घेतल्या जाणाऱ्या प्रत्येक गृहनिर्माण प्रकल्पाची सुरुवातीपासून ते पूर्ण होईपर्यंतची इत्थंभूत माहिती म्हाडाच्या वेबसाईटवर उपलब्ध करून दिली जाणार आहे. तसेच प्रकल्पाच्या कामात होणाऱ्या प्रगतीची माहिती वेळोवेळी अद्ययावत करावी लागणार आहे. त्यासाठी विशेष यंत्रणा तयार केली जाणार असल्याची माहिती म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. त्यामुळे एखाद्या प्रकल्पाच्या कामात प्रगती होत नसेल्याचे निदर्शनास आल्याने त्यावर तत्काळ बैठक घेऊन त्यामागील कारणांचा शोध घेऊन उपाययोजना करणे शक्य होईल, असे संबंधित अधिकाऱ्याने स्पष्ट केले.
अडथळे दूर करणे शक्य होणार
प्रत्येक गृहनिर्माण प्रकल्पाची माहिती संबंधित मंडळांना वेबसाईटवर अद्ययावत स्वरूपात उपलब्ध करून द्यावी लागणार आहे. त्यामध्ये प्रकल्पाला मंजुरी दिल्यानंतर परवानग्या, प्रत्यक्ष काम सुरू झाल्यानंतरची स्थिती आणि भोगवटा प्रमाणपत्राचा समावेश असणार आहे. त्यामुळे प्रकल्पाला परवानग्या मिळण्यास विलंब होत असल्याचे किंवा बांधकामाधिन असलेल्या प्रकल्पाच्या कामात प्रगती होत आहे की नाही सहजपणे समजणार आहे. त्यामुळे संबंधित विभागाला पाठपुरावा घेता येईल किंवा बैठक घेऊन येणाऱ्या समस्या दूर करण्याबाबत कार्यवाही करता येणार आहे.
सुसूत्रता येणार, लाॅटरीला बळ मिळणार
म्हाडाने कोणता प्रकल्प कधी सुरू केला आहे, तो कधीपर्यंत पूर्ण होईल, त्यामधून किती घरे उपलब्ध होऊ शकतील याबबातची माहिती संकेतस्थळावर असल्याने प्रत्येक विभागाला ती पाहून नियोजन करता येईल. तसेच एखाद्या प्रकल्पाला विलंब होत असेल, तर त्याला चालना देता येणार आहे. त्याबरोबर कामात सुसूत्रता येणार असल्याने भविष्यातील घरांच्या लाॅटरीला बळ मिळू शकणार आहे.
वाढीव खर्चाला चाप
प्रत्येक गृहनिर्माण प्रकल्प वेळेत पूर्ण व्हावा म्हणून त्याच्या कामातील प्रगती सातत्याने अद्यावत केली जाणार आहे. तसेच विलंब होणाऱ्या मुद्द्यांवर काम करणे शक्य होणार असल्याने प्रकल्प ठरलेल्या वेळेत पूर्ण होऊ शकणार असल्याने प्रकल्पाच्या वाढीव खर्चाला चाप लागणार असून, नियोजित खर्चात पूर्ण होऊ शकेल, असा विश्वासही म्हाडाच्या अधिकाऱ्याने व्यक्त केला.
-----------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.