

मुंबई, ता. ११ : सरकारी रुग्णालयांमधील सुविधांची स्थिती, आरोग्य योजनांची अंमलबजावणी आणि नागरिकांना उपचार घेताना येणाऱ्या अडचणी जाणून घेण्यासाठी सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर १ नोव्हेंबरपासून राज्यव्यापी दौरा करणार आहेत. ५ डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या ‘आरोग्य संवाद यात्रे’तून राज्यातील आरोग्य व्यवस्थेचा प्रत्यक्ष आढावा घेण्याचे नियोजन आहे. या काळात आरोग्य समित्यांचे सदस्य, स्थानिक लोकप्रतिनिधी, नागरिक आणि खासगी वैद्यकीय व्यावसायिकांशी चर्चा केली जाणार आहे.
या दौऱ्यात केवळ बैठका घेण्याऐवजी आरोग्य संस्थांच्या कामकाजाची प्रत्यक्ष पाहणी करण्यावर भर असेल, असे नियोजनात नमूद आहे. प्रत्येक जिल्ह्यातील पाच प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि दोन ग्रामीण रुग्णालयांना आरोग्यमंत्री अचानक भेट देणार आहेत. याशिवाय गावपातळीवरील उपकेंद्रांपासून ग्रामीण, उपजिल्हा आणि जिल्हा रुग्णालये, महापालिका रुग्णालये तसेच विशेष रुग्णालयांपर्यंतच्या सुविधांचा आढावा घेतला जाणार आहे.
दहा लाख सदस्यांशी संवादाचे उद्दिष्ट
राज्यातील जिल्हा, तालुका, महापालिका आणि ग्रामपातळीवरील आरोग्य समित्यांच्या सुमारे १० लाख सदस्यांसह सामान्य नागरिकांशी संवाद साधण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत आरोग्य समित्यांच्या बैठका घेतल्या जाणार असून, आरोग्य सेवांबाबतच्या तक्रारी, सूचना आणि अपेक्षा जाणून घेतल्या जातील. खासगी वैद्यकीय व्यावसायिकांशीही चर्चा होणार आहे. या प्रक्रियेत सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव, आयुक्त, संचालक आणि इतर वरिष्ठ अधिकारी सहभागी होणार आहेत. जिल्हा आरोग्य अधिकारी आणि जिल्हा शल्यचिकित्सकांसह विविध आरोग्य योजनांचे अधिकारीही दौऱ्यात सहभागी होतील.
योजनांची माहिती देण्यावरही भर
महात्मा फुले जनआरोग्य योजना, प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, मोफत डायलिसिस, एमआरआय, सीटी स्कॅन, मोफत रक्ततपासण्या, टेलिमेडिसिन आणि आपत्कालीन रुग्णवाहिका सेवा यांसारख्या योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचेही नियोजन आहे. जननी सुरक्षा योजना, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम आणि मानसिक आरोग्य समुपदेशनासारख्या सुविधांबाबतही जनजागृती केली जाणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.