

वैद्यकीय, दंतवैद्यकीय प्रवेश आता केंद्रीकृत
संस्थात्मक, एनआरआय कोट्यातील प्रवेशही ऑनलाइन
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : पदव्युत्तर वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेत राज्य सरकारने महत्त्वाचे बदल केले आहेत. यापुढे संस्था स्तरावर स्वतंत्र प्रवेश फेरी घेता येणार नसून, संस्थात्मक आणि अनिवासी भारतीय (एनआरआय) कोट्यातील जागांसह सर्व प्रवेश राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत (सीईटी सेल) केंद्रीकृत ऑनलाइन पद्धतीने केले जाणार आहेत. त्यामुळे खासगी महाविद्यालयांमधील प्रवेश प्रक्रियाही या यंत्रणेच्या कक्षेत येणार आहे.
राज्य शासनाने ५ ऑक्टोबर २०२६ला अधिसूचना जारी करून पूर्णवेळ व्यावसायिक पदव्युत्तर वैद्यकीय व दंतवैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी महाराष्ट्र व्यावसायिक शैक्षणिक संस्था (प्रवेशाचे विनियमन) नियम, २०२६ लागू केले आहेत. प्रवेश प्रक्रियेतील बदलांमुळे विद्यार्थ्यांना नव्या नियमांनुसार अर्ज आणि प्रवेशाचे नियोजन करावे लागणार आहे. नव्या नियमांनुसार महाविद्यालयांकडून संस्था स्तरावर घेतली जाणारी प्रवेश फेरी बंद करण्यात आली आहे. प्रवेशाच्या नियमित फेऱ्यांनंतर रिक्त राहणाऱ्या जागांसाठी होणारी ‘स्ट्रे व्हॅकन्सी’ फेरीही ऑनलाइन पद्धतीनेच राबवली जाणार आहे. संस्थात्मक कोटा आणि एनआरआय कोट्यातील जागांचाही केंद्रीकृत प्रक्रियेत समावेश करण्यात आला आहे. या बदलामुळे प्रवेशासाठी एकच केंद्रीय यंत्रणा कार्यरत राहणार आहे. मात्र, या व्यवस्थेची अंमलबजावणी करताना रिक्त जागांचे वाटप, फेऱ्यांचे वेळापत्रक आणि उमेदवारांना उपलब्ध असलेले पर्याय याबाबत सीईटी सेलच्या सूचनांना महत्त्व राहणार आहे.
संस्थात्मक कोट्यासाठी पात्रतेची व्याप्ती वाढली
संस्थात्मक कोट्यातील जागांसाठी पात्र उमेदवारांची व्याप्तीही वाढविण्यात आली आहे. महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र असेल, पण ज्यांनी राज्याबाहेरील संस्थेतून वैद्यकीय पदवी पूर्ण केली आहे, अशा उमेदवारांनाही या जागांसाठी पात्र ठरविण्यात आले आहे. याशिवाय महाराष्ट्राबाहेरील उमेदवार आणि परदेशी वैद्यकीय पदवीधारकांनाही खासगी महाविद्यालयांतील संस्थात्मक कोट्यातील जागांसाठी पात्रता देण्यात आली आहे. त्यामुळे या जागांसाठी अर्ज करू शकणाऱ्या उमेदवारांचा गट विस्तारणार आहे.
नोंदणीची अंतिम तारीख ठरणार निर्णायक
प्रवेशासाठी आवश्यक पात्रता निश्चित करताना नोंदणीची अंतिम तारीख हा कट-ऑफ दिनांक मानला जाणार आहे. या तारखेपर्यंत आवश्यक पात्रता पूर्ण न केलेल्या उमेदवाराला त्या शैक्षणिक वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेत सहभागी होता येणार नाही. अंतिम तारखेनंतर पात्रता प्राप्त झाली तरी ती संबंधित वर्षाच्या प्रवेशासाठी ग्राह्य धरली जाणार नाही. त्यामुळे उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी शैक्षणिक पात्रता, आवश्यक कागदपत्रे आणि संबंधित अटी पूर्ण झाल्या आहेत की नाहीत, याची खात्री करणे आवश्यक आहे. केवळ प्रवेशाच्या पुढील टप्प्यात पात्रता पूर्ण होईल, या अपेक्षेवर अर्ज केल्यास अडचण निर्माण होऊ शकते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.