हृदयावरील प्रगत उपचार मोफत

हृदयावरील प्रगत उपचार मोफत
Published on: 

हृदयावरील प्रगत उपचार मोफत
जे. जे. रुग्णालयात ‘सीआरटी-डी’, ‘सीएसपी’च्या २५ प्रक्रिया

भाग्यश्री भुवड : सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : हृदयाची कार्यक्षमता कमी झालेल्या आणि हृदयाच्या ठोक्यांमध्ये गंभीर अनियमितता असलेल्या रुग्णांसाठी आवश्यक असलेल्या प्रगत उपचारांचा खर्च अनेकदा लाखोंच्या घरात जातो, अशा रुग्णांना आर्थिक कारणांमुळे उपचारांपासून वंचित राहावे लागू नये, यासाठी ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर जे. जे. रुग्णालयात सीआरटी-डी आणि कंडक्शन सिस्टीम पेसिंग (सीएसपी) या उपचारपद्धती मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. २ मार्च २०२६ पासून या दोन्ही प्रकारच्या मिळून २५ प्रक्रिया करण्यात आल्याची माहिती रुग्णालयाच्या हृदयरोग विभागाचे सहयोगी प्राध्यापक व युनिटप्रमुख डॉ. अनंत मुंडे यांनी दिली.

डॉ. मुंडे यांनी सांगितले, ‘‘२ मार्च २०२६ला महात्मा जोतीराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत सीआरटी-डीची पहिली प्रक्रिया करण्यात आली. या योजनेंतर्गत महाराष्ट्रातील ही पहिली प्रक्रिया असल्याचा दावा त्यांनी केला. अधिष्ठाता डॉ. अजय भंडारवार आणि वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय सुरासे यांच्या नेतृत्वाखाली हृदयरोग विभागातील पथकाने या उपचारांची अंमलबजावणी केली. सीआरटी-डी उपकरण बसविण्याच्या प्रक्रियेसाठी खासगी रुग्णालयांमध्ये साधारणतः ११ ते १५ लाख रुपयांपर्यंत खर्च येऊ शकतो. उपकरणाचा प्रकार, रुग्णालय आणि रुग्णाची प्रकृती यानुसार हा खर्च बदलतो. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांसाठी अशा उपचारांचा खर्च मोठे आव्हान ठरू शकतो. जे. जे. रुग्णालयात पात्र रुग्णांना योजनेंतर्गत हे उपचार मोफत मिळत असल्याने त्यांच्यावरील आर्थिक भार कमी होण्यास मदत होत आहे. राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने ४ नोव्हेंबर २०२५ला जारी केलेल्या शासन निर्णयात सुधारित उपचार यादीमध्ये सीआरटी-डीचा समावेश करण्यात आला आहे.


‘सीआरटी-डी’ उपचार कोणासाठी?
सीआरटी-डी म्हणजे कार्डियाक रिसिंक्रोनायझेशन थेरपी-डिफिब्रिलेटर हृदयाच्या दोन्ही खालच्या कप्प्यांचे आकुंचन योग्य समन्वयाने होत नसल्यास तो समन्वय सुधारण्यास हे उपकरण मदत करते. त्याचबरोबर हृदयाच्या ठोक्यांची जीवघेणी अनियमितता आढळल्यास उपकरण विद्युत धक्का देऊन हृदयाची लय पूर्ववत करण्याचा प्रयत्न करू शकते.

निवडक रुग्णांसाठी उपचार
औषधोपचार करूनही हृदयाची पम्पिंग क्षमता कमी राहणाऱ्या आणि विशिष्ट विद्युत वहनविषयक समस्या असलेल्या निवडक रुग्णांसाठी हा उपचार उपयुक्त ठरू शकतो. योग्य रुग्णांमध्ये धाप लागणे व थकवा कमी होणे, दैनंदिन कामकाजाची क्षमता सुधारणे आणि रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण कमी होणे असे फायदे मिळू शकतात. मात्र प्रत्येक हृदयविकाराच्या रुग्णाला या उपकरणाची आवश्यकता असतेच असे नाही.

‘सीएसपी’मुळे नैसर्गिक विद्युत वहन यंत्रणेला चालना
कंडक्शन सिस्टीम पेसिंग ही हृदयाच्या नैसर्गिक विद्युत वहन यंत्रणेला उद्दीपित करणारी पेसिंग पद्धत आहे. हृदयाचे ठोके नियमित ठेवण्यासाठी वारंवार पेसिंगची आवश्यकता असलेल्या काही रुग्णांमध्ये ही पद्धत वापरली जाते. निवडक रुग्णांमध्ये हृदयाच्या आकुंचनाचा समन्वय टिकविण्यासही तिची मदत होऊ शकते. सीआरटी-डी आणि सीएसपी या दोन्ही प्रक्रिया रुग्णाच्या आजाराचे स्वरूप, हृदयाची कार्यक्षमता आणि तपासण्यांचे निष्कर्ष विचारात घेऊन केल्या जातात. त्यामुळे उपचाराची गरज आणि योग्य पद्धत निश्चित करण्यासाठी हृदयरोगतज्ज्ञांची तपासणी आवश्यक असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com