

सांताक्रूझ-चेंबूर जोडरस्ता उड्डाणपुलाच्या दुरुस्ती खर्चात १३.४४ कोटींची वाढ
कंत्राटदाराला सहा महिन्यांची मुदतवाढ
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १२ : पूर्व उपनगरातील सांताक्रूझ-चेंबूर जोडरस्ता आणि स्वामीनारायण उड्डाणपुलाच्या दुरुस्तीच्या कामात वाढ झाली आहे. पुलांचे मजबुतीकरण, रचनात्मक दुरुस्ती आणि बेअरिंग बदलण्याच्या मूळ कामात फेरफार झाल्यामुळे या प्रकल्पाच्या खर्चात सुमारे १३ कोटी ४४ लाख रुपयांची भर पडली आहे. या वाढीव खर्चामुळे मूळ २५.८४ कोटी रुपयांचे कंत्राट आता ३९.२८ कोटी रुपयांवर पोहोचले असून, पालिकेने कामाची मुदत मार्च २०२७ पर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी सादर केला आहे.
महापालिकेने पूर्व उपनगरातील परिमंडळ-५ मधील सांताक्रूझ-चेंबूर जोडरस्ता आणि पूर्व मुक्त मार्गावरील स्वामीनारायण उड्डाणपुलाच्या दुरुस्तीचे काम एका खासगी कंत्राटदाराला दिले होते. यासाठी मूळ कंत्राट रक्कम २५ कोटी ८४ लाख ०१ हजार ९६४ रुपये निश्चित करण्यात आली होती. २३ जून २०२५ ते २२ सप्टेंबर २०२६ असा १५ महिन्यांचा हा मूळ कालावधी होता. यातील स्वामीनारायण उड्डाणपुलाची कामे आता पूर्ण झाली आहेत.
आयआयटी मुंबईचा अहवाल आणि २०२३ मधील तांत्रिक तपासणीनुसार या दुरुस्ती कामांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले होते, मात्र प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईपर्यंत दोन वर्षांचा कालावधी लोटल्यामुळे पुलांच्या विविध घटकांमधील रचनात्मक बिघाडांचे प्रमाण वाढल्याचे जुलै २०२५ मधील फेरतपासणीत स्पष्ट झाले. नुकसानाची व्याप्ती वाढल्याने दुरुस्ती आणि पुनर्वसनाच्या कामांमध्ये बदल करणे अपरिहार्य ठरले.
कामाचे स्वरूप बदलल्यामुळे अतिरिक्त बाबींचा अंतर्भाव करावा लागला. वस्तू व सेवा करासह या फेरफार कामांचे मूल्य १३ कोटी २८ लाख रुपयांहून अधिक होते. कंत्राटदाराची उणी टक्केवारी, सुरक्षा ठेव आणि इतर बाबींचा विचार करून मूळ किमतीत १३ कोटी ४४ लाख ४२ हजार ७९९ रुपयांची वाढ सुचवण्यात आली आहे. यामुळे कंत्राटाची एकूण रक्कम ३९ कोटी २८ लाख ४४ हजार ७६३ रुपयांवर गेली असून, मूळ रकमेत तब्बल ५२.०३ टक्क्यांची वाढ झाली आहे.
प्रस्ताव स्थायी समितीसमोर
कामाची व्याप्ती वाढल्याने कंत्राटाचा कालावधी वाढवून २१ महिने करण्यात आला आहे. त्यानुसार, २३ सप्टेंबर २०२६ ते २१ मार्च २०२७ अशी सहा महिन्यांची मुदतवाढ देण्याची शिफारस करण्यात आली आहे. या वाढीव खर्चाला तांत्रिक खर्चवाढ समितीने २१ एप्रिल २०२६ रोजीच मंजुरी दिली असून, आता अंतिम मान्यतेसाठी हा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.