निविदेविना ‘केपीएमजी’ची वर्णी

निविदेविना ‘केपीएमजी’ची वर्णी
Published on: 

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. १२ : ‘विकसित भारत २०४७’ या संकल्पनेनुसार महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य सेवांचे सुटसुटीत आणि प्रभावी व्यवस्थापन करण्यासाठी एक मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावरील आरोग्य प्रकल्पांचा सर्वसमावेशक आराखडा तयार करण्यासाठी मे. केपीएमजी ॲडव्हायझरी सर्व्हिसेस प्रा. लि. यांची तज्ज्ञ सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
​
या कामासाठी वृत्तपत्रांत सार्वजनिक निविदा न काढता राज्य सरकारच्या पॅनेलवरील केपीएमजी कंपनीची थेट निवड करण्यात आल्याने, या प्रस्तावास आता स्थायी समितीची कार्योत्तर मंजुरी मिळवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
​
महापालिकेच्या माध्यमिक आरोग्यसेवा विभागामार्फत सादर करण्यात आलेल्या प्रस्तावानुसार, ही नियुक्ती २० जुलै २०२६ ते २५ जुलै २०२७ या १२ महिन्यांच्या कालावधीसाठी करण्यात आली आहे. केपीएमजी या नामांकित सल्लागार संस्थेला प्रतिमहा ३,४५,००० रुपये मानधन दिले जाणार असून, १२ महिन्यांच्या या संपूर्ण कंत्राटाचे मूल्य ४१,४०,००० रुपये इतके आहे.

अट शिथिल करून कार्योत्तर मंजुरी
अद्ययावत मुंबई महापालिका अधिनियमानुसार तीन लाखांपेक्षा जास्त खर्चाच्या कामासाठी वर्तमानपत्रात जाहिरात देऊन निविदा मागवणे अनिवार्य असते, मात्र केपीएमजी कंपनी महाराष्ट्र सरकारच्या ५ ऑक्टोबर २०२३च्या शासन निर्णयानुसार आधीच राज्य शासनाच्या पॅनेलवर सूचीबद्ध आहे. प्रदीर्घ चालणारी सामान्य निविदा प्रक्रिया टाळणे आणि राज्य सरकारच्या ‘पीपीपी धोरण २०२६’मधील कालमर्यादेचे पालन करणे आवश्यक होते. तसेच राज्य सरकारने निश्चित केलेल्या दरपत्रकानुसारच मानधन दिले जात असल्याने पालिकेचे कोणतेही आर्थिक नुकसान होणार नाही. त्यामुळे वर्तमानपत्रात निविदा प्रसिद्ध करण्याची अट शिथिल करून कार्योत्तर मंजुरी मागण्यात आली आहे.

‘सल्लागार’च्या रूपात काम पाहणार
केपीएमजी ही संस्था ४९० खाटांचे भगवती रुग्णालय, ४७० खाटांचे श्रीमती म. तु. अगरवाल रुग्णालय (हायब्रिड मॉडेल), १५० खाटांचे ओशिवरा प्रसूती व बालरोग रुग्णालय आणि इतर नऊ तयार सुविधांवर काम करेल. तसेच शताब्दी रुग्णालयात (गोवंडी) १०० जागांचे वैद्यकीय महाविद्यालय (एमबीबीएस) व ५८० खाटांचे रुग्णालय, तर के. बी. भाभा रुग्णालयाजवळ (वांद्रे) १०० क्षमतेचे नर्सिंग महाविद्यालय उभारण्यासाठी ही संस्था तांत्रिक, आर्थिक व निविदा मसुदा सल्लागार म्हणून काम पाहणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com