

गोवंडीतील रफीनगर पालिका शाळेचा होणार कायापालट
नऊ मजली भव्य इमारतीसाठी ७८.९८ कोटींचा खर्च; स्थायी समितीसमोर अंतिम प्रस्ताव
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १४ : गोवंडी पश्चिमेतील रफीनगर पालिका शाळेची जीर्ण झालेली इमारत पाडून त्या जागी तळमजला अधिक नऊ मजल्यांची अत्याधुनिक व सुसज्ज नवी इमारत उभारण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. या भव्य शैक्षणिक प्रकल्पासाठी सुमारे ६५ कोटी १४ लाख रुपयांचे कंत्राट निश्चित करण्यात आले असून, सल्लागार शुल्कासह एकूण ७८ कोटी ९८ लाख रुपयांच्या खर्चाचा प्रस्ताव मंजुरीसाठी स्थायी समिती आणि उपनगरे स्थापत्य समितीकडे सादर करण्यात आला आहे.
गोवंडी व्हिलेज येथील रफीनगर पालिका शाळेची इमारत साधारण २००० मध्ये बांधण्यात आली होती. पत्र्याचे छत, लोड बेअरिंग रचना आणि तळमजला अधिक एक मजला असलेल्या या २५ वर्षे जुन्या इमारतीत सध्या हिंदी व उर्दू माध्यमाचे सुमारे दोन हजार २५१ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, मात्र गेल्या काही वर्षांत इमारतीचे प्लास्टर पडणे, काँक्रीट उखडणे आणि खांबांना तडे जाणे अशा गंभीर समस्या निर्माण झाल्या होत्या. ‘पेंटॅकल कन्सल्टंट’ या संस्थेने केलेल्या स्ट्रक्चरल ऑडीटमध्ये इमारत ‘सी-२ ए’ श्रेणीत (तातडीने दुरुस्ती/टप्प्याटप्प्याने निष्कासित करणे) मोडत असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी ही इमारत निष्कासित करून नवीन इमारत उभारण्याचा निर्णय पालिकेने घेतला.
नव्याने प्रस्तावित इमारतीचे डिझाइन आधुनिक शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन करण्यात आले आहे. तळमजल्यावर स्वागत कक्ष, महिला संस्था सभागृह, केअर सेंटर, वैद्यकीय केंद्र आणि अत्याधुनिक अग्निरोधक यंत्रणा,१ ला ते ९ वा मजल्यावर २८ हून अधिक वर्गखोल्या, मुख्याध्यापक व शिक्षकांसाठी स्वतंत्र कक्ष, व्हर्च्युअल क्लासरूम, ऑडिओ-व्हिज्युअल रूम, भव्य ग्रंथालय, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र व संगणक प्रयोगशाळा, इनडोअर खेळांसाठी कक्ष, कौशल्य विकास केंद्र आणि भोजन कक्ष असेल.तर प्रत्येक मजल्यावर विद्यार्थी, शिक्षक आणि दिव्यांगांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे असतील. इमारतीमध्ये चार लिफ्ट आणि आणीबाणीच्या प्रसंगासाठी स्मोक चेक लॉबीची तरतूद करण्यात आली आहे.
तीप वर्षांत काम पूर्ण करावे लागणार
या कामासाठी पालिकेने मागविलेल्या निविदेत सहा कंत्राटदारांनी भाग घेतला होता. पालिकेच्या अंदाजित दरापेक्षा २०.५४ टक्के कमी दर सादर करणाऱ्या ‘मे. एम. एस. एंटरप्रायझेस’ या कंत्राटदाराची निविदा स्वीकारण्याची शिफारस नगर अभियंत्यांनी केली आहे. कंत्राटदाराला पावसाळ्यासह ३६ महिन्यांचा (तीन वर्षे) कालावधी देण्यात येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.