

परीक्षा काळात जनगणनेचा दुसरा टप्पा?
शिक्षकांवरील अतिरिक्त जबाबदारी; विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीची भीती
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १२ : राज्यात जनगणना २०२७ च्या दुसऱ्या टप्प्यातील लोकसंख्या गणनेच्या तयारीला वेग आला आहे. या कामासाठी शिक्षकांसह अन्य विभागांतील पात्र कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. जनगणनेचे नियोजन आणि प्रत्यक्ष कामकाजाचा कालावधी शालेय परीक्षांच्या काळात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे दहावी, बारावी तसेच इतर परीक्षांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे जनगणनेची जबाबदारी आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित यांचा समतोल कसा साधला जाणार, असा प्रश्न शिक्षण क्षेत्रातून उपस्थित होत आहे.
जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्यातील कामाचे प्रभावी नियोजन करण्यासाठी मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय जनगणना समन्वय समितीची दुसरी बैठक झाली. या बैठकीत राज्यातील सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याचे आणि जनगणनेच्या वेळापत्रकानुसार सूक्ष्म नियोजन करून कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले. दुसऱ्या टप्प्यासाठी आवश्यक अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून देताना गृह रक्षक दल, वन विभाग, जिल्हा परिषद आणि शिक्षकांसह अन्य पात्र कर्मचाऱ्यांची प्रगणक व पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यासाठी संबंधित जिल्हास्तरीय कार्यालयांनी पात्र अधिकारी व कर्मचाऱ्यांची यादी तयार करून जनगणना चार्ज अधिकाऱ्यांकडे उपलब्ध करून द्यावी, असेही निर्देश देण्यात आले आहेत. शिक्षकांना जनगणनेच्या कामासाठी नियुक्त केल्यास अध्यापन, परीक्षांचे नियोजन, उत्तरपत्रिका तपासणी आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक तयारीवर अतिरिक्त ताण निर्माण होण्याची शक्यता आहे.
बैठकीत जनगणना कार्य संचालनालयाच्या संचालिका तथा केंद्र शासनाच्या सहसचिव डॉ. निरुपमा जे. डांगे यांनी पहिल्या टप्प्यातील कामाचा आढावा, महत्त्वाचे निष्कर्ष आणि दुसऱ्या टप्प्याच्या अंमलबजावणीसाठीच्या नियोजनाची माहिती दिली.
मार्च २०२७ पर्यंत विविध उपक्रमांचे नियोजन
राज्यात जनगणना २०२७ चा पहिला टप्पा म्हणजेच घरयादी व घरगणना मे-जून २०२६ दरम्यान पूर्ण झाला आहे. आता दुसऱ्या टप्प्यासाठी जिल्हास्तरीय प्रशिक्षण, प्रगणक व पर्यवेक्षकांच्या नियुक्त्या, स्व-गणना आणि प्रत्यक्ष क्षेत्रीय कामाचे नियोजन करण्यात येत आहे. हे उपक्रम मार्च २०२७ पर्यंत राज्यभर राबविण्यात येणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. याच कालावधीत विविध शालेय व मंडळांच्या परीक्षांचे वेळापत्रक, परीक्षापूर्व तयारी आणि इतर शैक्षणिक कामेही सुरू असतात.
प्रशिक्षण आणि जनजागृतीवरही भर
जनगणना प्रक्रियेत नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी स्थानिक पातळीवर जनजागृती आराखडा तयार करण्यात येत आहे. तसेच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना स्वतःची आणि कुटुंबाची स्व-गणना करण्यासाठी प्रोत्साहित केले जाणार आहे. भारताचे महारजिस्ट्रार व जनगणना आयुक्त कार्यालयाने १४ ऑगस्ट २०२६ रोजी दुसऱ्या टप्प्यात विचारण्यात येणाऱ्या ४० प्रश्नांची यादी अधिसूचित केली आहे. महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात ३ सप्टेंबर २०२६ रोजी तिचे पुनर्प्रकाशन करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.