जे.जे.च्या वसतिगृहातील विद्यार्थ्याचा मृत्यू

जे.जे.च्या वसतिगृहातील विद्यार्थ्याचा मृत्यू
Published on: 

जे.जे.च्या वसतिगृहातील विद्यार्थ्याचा मृत्यू
अस्वच्छतेमुळे आरोग्य धोक्यात; ९० जण आजारी

भाग्यश्री भुवड ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १२ : सर जे. जे. समूह रुग्णालयाशी संलग्न परिचर्या महाविद्यालयातील बीएससी नर्सिंगच्या तृतीय सत्रात शिकणाऱ्या २१ वर्षीय गजानन जामगे या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. या मृत्यूमागे मलेरिया कारणीभूत असल्याचे परिचर्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. या घटनेमुळे वसतिगृहातील अस्वच्छता आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
जे. जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय भंडारवार यांनी ही घटना अत्यंत दुःखद असल्याचे सांगितले. विद्यार्थ्याला वाचवण्यासाठी सर्व वैद्यकीय प्रयत्न करण्यात आले; मात्र त्याचा मृत्यू झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विद्यार्थ्याला १०८ अंश ताप असल्याचेही त्यांनी नमूद केले. रुग्णालय परिसरातील स्वच्छतेवर भर दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले. मूळच्या परभणी जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबातील असलेल्या गजाननला शुक्रवारी रात्री अचानक ताप आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तपासणीत त्याला मलेरियाचे निदान झाले. उपचारादरम्यान शनिवारी रात्री त्याला मेंदूमृत घोषित करण्यात आले. शवविच्छेदन अहवालानुसार, मलेरियाच्या गंभीर स्वरूपामुळे शरीरातील अनेक अवयवांचे कार्य बिघडू लागले होते. तसेच मूत्रपिंडाला गंभीर इजा झाल्याचे आणि मेंदूमध्ये रक्तस्राव झाल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
वसतिगृहात दूषित पाणी, अस्वच्छ स्वच्छतागृहे, साचलेले पाणी, डासांचा प्रादुर्भाव आणि जैववैद्यकीय कचऱ्याची साठवणूक यांमुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आल्याचा आरोप होत आहे. सुमारे ४०हून अधिक बीएससी नर्सिंगचे विद्यार्थी, तर पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे ५०हून अधिक विद्यार्थी डेंगी, मलेरिया आणि टायफॉइडने त्रस्त असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले. विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार, वसतिगृहातील पाण्याच्या टाकीची चार वर्षांपासून स्वच्छता झालेली नाही. टाकीत सिगारेटचे अवशेष आणि दारूच्या बाटल्या आढळल्याचा दावा करण्यात आला आहे. पाणीशुद्धीकरण यंत्रणा बंद असल्याने वॉटर कूलरमधून मिळणारे पाणी शुद्ध होत नसल्याची तक्रार आहे. स्वच्छतागृहे व स्नानगृहांची नियमित साफसफाई होत नसून, वातानुकूलन यंत्रणांमधून पडणारे पाणी आणि कॅन्टीनचे उघडे ड्रेनेज यामुळे डासांची उत्पत्ती वाढत आहे. कचरापेट्यांतील कचरा पसरवणारी मांजरीची सुमारे २० पिल्ले, काही खोल्यांतील ढेकणांचा प्रादुर्भाव आणि मुलांच्या वसतिगृहाकडे होणारे कथित दुर्लक्ष यांबाबतही विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली. वसतिगृहालगत सार्वजनिक बांधकाम विभागाचे भंगार व साहित्य साठवण्यात आले असून, महिनाभरापासून जैववैद्यकीय कचराही तेथे ठेवल्याची तक्रार आहे. याबाबत पत्रव्यवहार करूनही ठोस कार्यवाही झाली नसल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप आहे. आजारपणामुळे उपचारांचा खर्च वाढत असून, अभ्यासाचेही नुकसान होत आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांच्या तक्रारींबाबत वसतिगृह प्रशासन, महाविद्यालय आणि संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेण्याची तयारी सुरू असल्याचे प्रतिनिधींनी सांगितले.
...
तातडीच्या उपाययोजनांची मागणी
पाण्याच्या टाकीची स्वच्छता, शुद्धीकरण यंत्रणेची दुरुस्ती, स्वच्छतागृहांची नियमित सफाई, डासप्रतिबंधक फवारणी, साचलेल्या पाण्याचा निचरा, ढेकणांचा बंदोबस्त आणि जैववैद्यकीय कचऱ्याची नियमानुसार विल्हेवाट लावण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.
...
जे. जे. रुग्णालयात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. वसतिगृहाची स्वच्छता होत नाही. अडगळीतील सर्व सामान वसतिगृहाशेजारी ठेवण्यात आले आहे. अनेक डॉक्टर आणि बीएससीचे विद्यार्थी आजारी पडले आहेत. प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात.
- डॉ. अथर्व शिंदे, अध्यक्ष, सेंट्रल मार्ड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com