

मुंबईतील एसआरए प्रकल्पांचे होणार ‘ऑडिट’
रखडलेल्या प्रकल्पांना गती देण्यासाठी समिती
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १२ : मुंबईतील रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांना गती देण्यासाठी झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प योजनेतील कायदेशीर पेच सोडविण्यासाठी आणि झोपडपट्टीमुक्त मुंबईचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. शासन निर्णयानुसार तज्ज्ञांची एक समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या माध्यमातून रखडलेल्या एसआरए प्रकल्पांचे ऑडिट केले जाणार आहे.
गृहनिर्माण विभागाच्या अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. या तज्ज्ञ समितीत शिवसेना सरचिटणीस माजी खासदार राहुल शेवाळे यांसह वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. एसआरए प्रकल्प रखडल्याने न्यायालयात अनेक प्रकरणे काही वर्षांत दाखल करण्यात आली आहेत. या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार राज्य सरकारने पुढाकार घेऊन गेल्या महिन्यात महत्त्वपूर्ण शासन निर्णय काढला. यानुसार गृहनिर्माण विभागाच्या अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक तज्ज्ञ समिती स्थापन करण्यात आली. या समितीमध्ये अध्यक्षांसह नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव, माजी खासदार राहुल शेवाळे, आमदार पराग अळवणी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी, नगररचना विभागाचे संचालक, मुंबई महापालिकेच्या विकास नियोजन विभागाचे प्रमुख अभियंता, पुणे महापालिकेचे शहर अभियंता यांसह तीन वास्तुविशारदांचा समावेश करण्यात आला आहे.
या समितीला प्रामुख्याने महाराष्ट्र झोपडपट्टी क्षेत्र (निर्मूलन आणि पुनर्विकास) अधिनियम, १९७१चे ऑडिट करणे अनिवार्य आहे. तसेच ८ मे २०२६ रोजी यासंदर्भात उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशात नमूद मुद्दे, वकील आणि कायदे तज्ज्ञांनी केलेल्या शिफारशी याबाबत समितीला अभ्यास करावा लागणार आहे. याव्यतिरिक्त, झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प जलद गतीने राबविण्यासाठी शिफारशींसह १० महिन्यांत प्राथमिक अहवाल समितीच्या वतीने शासनाला सादर करण्यात येणार असल्याची माहिती माजी खासदार राहुल शेवाळे यांनी दिली.
-------------------------------
विविध कारणांमुळे मुंबईतील अनेक झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प खूप वर्षांपासून रखडले आहेत. एसआरए प्रकल्प रखडल्याने हवालदिल झालेल्या मुंबईतल्या शेकडो कुटुंबांना त्यांच्या हक्काचे घर मिळवून देण्यासाठी आम्ही समितीच्या माध्यमातून सर्वतोपरी प्रयत्न करू.
- राहुल शेवाळे, माजी खासदार, शिवसेना
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.