

मुंबई, ता. १३ : विरार-डहाणू रेल्वे मार्गाच्या चौपदरीकरणाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकत मुंबई रेल्वे विकास महामंडळाने (एमआरव्हीसी) वाणगाव येथे आधुनिक इलेक्ट्रॉनिक सिग्नल यंत्रणा कार्यान्वित केली आहे. या यंत्रणेमुळे रेल्वेगाड्यांची रुळांवरील स्थिती ओळखणे आणि त्यांची सुरक्षित हालचाल नियंत्रित करणे अधिक सोपे होणार आहे. मुंबई नागरी परिवहन प्रकल्प-३ (एमयूटीपी-३) अंतर्गत हे काम करण्यात आले.
११ ऑक्टोबरला सकाळी ८.०५ ते दुपारी ३.०५ या सात तासांच्या नियोजित ब्लॉकदरम्यान ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली, मात्र सर्व प्रमुख कामे नियोजित वेळेच्या २५ मिनिटे आधी, दुपारी २.४० वाजताच पूर्ण झाली.
गाड्यांच्या हालचालींसाठी ३६ नवे मार्ग
वाणगाव यार्डात नव्या इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग प्रणालीद्वारे ११ सिग्नल, १४ पॉइंट्स आणि ३० ट्रॅक विभाग कार्यान्वित करण्यात आले. याशिवाय, आधीच्या २५ मार्गांमध्ये आणखी ३६ मार्गांची भर पडली आहे. हे मार्ग म्हणजे यार्डात गाड्यांच्या सुरक्षित ये-जा करण्यासाठी सिग्नल यंत्रणेत निश्चित केलेले मार्ग आहेत. ते ३६ स्वतंत्र रेल्वे मार्ग नाहीत.
बोईसर-वाणगाव विभागातही सुधारणा
बोईसर-वाणगाव स्वयंचलित सिग्नल विभागातील रिले हट क्रमांक ७ आणि ८ येथेही नवीन इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग उपकरणे कार्यान्वित करण्यात आली. या ठिकाणी ११ सिग्नल, गाडीची उपस्थिती तपासण्यासाठी दुहेरी यंत्रणेसह २२ ट्रॅक विभाग आणि १० मार्ग सुरू करण्यात आले. यासाठी फ्रॉशर कंपनीच्या एफएडीएसी आधारित ट्रॅक डिटेक्शन प्रणालीचा वापर करण्यात आला आहे.
चौपदरीकरणाच्या पुढील कामांना चालना
‘एमआरव्हीसी’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विलास वाडेकर यांनी सांगितले की, पहिल्या टप्प्यातील काम यशस्वी झाल्यामुळे वाणगाव स्थानक आणि यार्डाच्या चौपदरीकरणासाठी आवश्यक पुनर्रचना व अन्य कामे हाती घेता येतील. या प्रकल्पामुळे विरार-डहाणू मार्गाची वाहतूक क्षमता वाढविणे आणि मुंबई उपनगरी रेल्वेच्या पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण करणे शक्य होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.