

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १४ : बदलती जीवनशैली, अयोग्य आहार, मैदानी खेळांचा अभाव आणि अपुरी झोप यामुळे मुलांमधील लठ्ठपणाची समस्या वाढत आहे. मुंबईतील बाई जेरबाई वाडिया बाल रुग्णालयात गेल्या तीन वर्षांत लठ्ठपणाने ग्रस्त सुमारे ३०० मुले आणि किशोरवयीन रुग्णांची नोंद झाली आहे. दरवर्षी सरासरी १०० मुले उपचारासाठी येत असल्याची माहिती रुग्णालयाने दिली.
लठ्ठपणामुळे मुलांमध्ये टाइप-२ मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉलचे असंतुलन, यकृतामध्ये चरबी साठणे, झोपेत श्वास घेण्यास अडथळे आणि सांधेदुखी अशा समस्या उद्भवू शकतात. किशोरवयीन मुलींमध्ये इन्सुलिन रेझिस्टन्समुळे मासिक पाळी अनियमित होण्यासह पीसीओएसचा धोका वाढू शकतो.
वाडिया बाल रुग्णालयाच्या वैद्यकीय संचालक आणि बाल-अंतःस्रावतज्ज्ञ डॉ. सुधा राव यांच्या मते, रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या लठ्ठ मुलांपैकी ८० टक्क्यांहून अधिक मुलांमध्ये जीवनशैलीशी संबंधित कारणे आढळतात. त्यामुळे प्रत्येक मुलाचे वाढलेले वजन हार्मोनल विकारामुळेच असते, असे नाही, मात्र अगदी लहान वयात लठ्ठपणा दिसणे, वजन वेगाने वाढणे किंवा वजन वाढत असताना उंची अपेक्षेप्रमाणे न वाढणे यांसारख्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये.
२०२२ मधील अंदाजानुसार, भारतात ५ ते १९ वर्षे वयोगटातील सुमारे ३.४ टक्के मुले लठ्ठपणाने प्रभावित होती. राष्ट्रीय आकडेवारीनुसार, पाच वर्षांखालील मुलांमध्ये २.७ टक्के, ५ ते ९ वर्षे वयोगटात ४.२ टक्के आणि १० ते १९ वर्षे वयोगटात ५ टक्के मुलांमध्ये अतिरिक्त वजन किंवा लठ्ठपणा आढळतो.
संतुलित आहाराला प्राधान्य
मुलांवर आहाराची कठोर बंधने घालण्याऐवजी कुटुंबाने संतुलित आहार, फळे-भाज्यांचे सेवन, नियमित शारीरिक हालचाल, मर्यादित स्क्रीन टाइम आणि पुरेशी झोप यांना प्राधान्य द्यावे. तसेच मुलांना वजनावरून दोष देण्याऐवजी आरोग्यदायी सवयी विकसित करण्यासाठी प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.
वैद्यकीय मार्गदर्शन घ्यावे
लठ्ठपणाचे वेळेत निदान आणि उपचार करण्यासाठी वाडिया बाल रुग्णालयात दर शनिवारी दुपारी २ ते ५ या वेळेत स्वतंत्र बाह्यरुग्ण विभाग सुरू करण्यात आला आहे. लठ्ठपणा आणि चयापचयाशी संबंधित विकारांवरही रुग्णालयात संशोधन सुरू आहे. रुग्णालयाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिनी बोधनवाला यांनी मुलांमधील लठ्ठपणाकडे शारीरिक दोष किंवा लाजिरवाणी बाब म्हणून न पाहता, वेळीच वैद्यकीय मार्गदर्शन घेण्याचे आवाहन केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.