‘ऑक्टोबर हीट’चा तडाखा!

‘ऑक्टोबर हीट’चा तडाखा!
Published on: 

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. १३ : राज्यातून परतीच्या पावसाने निरोप घेतला असला तरी गुलाबी थंडीची वाट पाहणाऱ्या मुंबईकरांना सध्या तीव्र उकाड्याने अक्षरशः घाम फोडला आहे. ऑक्टोबर महिन्यातील तीव्र सूर्यप्रकाशासह वाढलेल्या आर्द्रतेमुळे मुंबईत ‘ऑक्टोबर हीट’चा प्रचंड प्रकोप पाहायला मिळत आहे. सोमवारी उपनगरांतील कमाल तापमान ३८.२ अंश सेल्सिअसवर पोहोचले, जे सरासरीपेक्षा तब्बल ५.१ अंशांनी जास्त होते. गेल्या ११ वर्षांतील ऑक्टोबर महिन्यातील हा दुसरा सर्वात उष्ण दिवस ठरला असून, सहा दिवसांच्या कालावधीत मुंबईकरांनी दुसऱ्यांदा उष्णतेच्या लाटेचा सामना केला आहे.
​
हवामान विभागाच्या (आयएमडी) नियमांनुसार, तापमान सरासरीपेक्षा ४.५ अंश सेल्सिअस किंवा त्याहून अधिक वाढल्यास उष्णतेची लाट घोषित केली जाते. यापूर्वी ९ ऑक्टोबरला शहरात ३७.८ अंश सेल्सिअस तापमानासह पहिली लाट नोंदवली गेली होती. सोमवारी नोंदवलेले ३८.२ अंश सेल्सिअस हे तापमान १७ ऑक्टोबर २०१५च्या (३८.६ अंश सेल्सिअस) विक्रमानंतरचे सर्वकालीन दुसरे सर्वाधिक तापमान ठरले आहे. कुलाबा हवामान केंद्रातही ३६.५ अंश सेल्सिअस (सरासरीपेक्षा ३.९ अंशांनी अधिक) तापमानाची नोंद झाली. मुंबईव्यतिरिक्त ठाणे (३७.९ अंश सेल्सियस), पालघर (३६.० अंश सेल्सिअस) आणि रायगड (३४.६ अंश सेल्सिअस) जिल्ह्यांतही उन्हाचा प्रचंड तडाखा बसला आहे.
​
​‘आयएमडी’च्या वरिष्ठ शास्त्रज्ञ सुषमा नायर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई आणि आसपासच्या परिसरात ‘प्रति-चक्रवात’ निर्माण झाल्यामुळे आणि पूर्वेकडील वाऱ्यांमुळे समुद्रावरून थंड वारे येण्यास उशीर होत आहे. परिणामी, हवेतील बाष्प आणि दमटपणा वाढून उकाड्याची तीव्रता कैक पटीने वाढली आहे. माजी प्रमुख के. एस. होसाळीकर यांनी सांगितले, की सकाळी ९ वाजताच तापमान ३२-३३ अंशांवर जात असून, रात्री ७ वाजेपर्यंत उकाडा कायम राहत आहे, ही अत्यंत चिंतेची बाब आहे.

​हवामान विभागाचा यलो अलर्ट आणि इशारा
हवामान खात्याने मंगळवारसाठी शहरात यलो अलर्ट जारी केला असून, पुढील काही दिवस उष्ण व दमट हवामान कायम राहण्याचा अंदाज आहे. गुजरात आणि महाराष्ट्राच्या सीमेवरील प्रति-चक्रवात कमकुवत झाल्यानंतरच तापमानात घट होण्याची शक्यता आहे. या वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी दुपारच्या वेळी विनाकारण घराबाहेर पडणे टाळावे, पुरेसे पाणी प्यावे आणि आरोग्याची योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com