पालिकेचा सहा महिने जुना हिशोब स्थायी समितीसमोर; विकासकामांच्या पार्श्वभूमीवर चर्चेची शक्यता

पालिकेचा सहा महिने जुना हिशोब स्थायी समितीसमोर; विकासकामांच्या पार्श्वभूमीवर चर्चेची शक्यता
Published on: 

महापालिकेचा सहा महिने
जुना हिशेब स्थायी समितीसमोर
विकासकामांच्या पार्श्वभूमीवर चर्चेची शक्यता
​सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १३ : महापालिका प्रशासनाचे नवे आर्थिक वर्ष सुरू होऊन सहा महिने पूर्ण झाल्यानंतर, आता कुठे मागील आर्थिक वर्षाच्या अखेरचा शिल्लक निधी स्थायी समितीसमोर सादर करण्यात आला आहे. ३१ मार्च २०२६ मध्ये संपलेल्या आर्थिक वर्षाचा हा ताळेबंद थेट ऑक्टोबर महिन्यात पटलावर आल्याने, पारदर्शकतेबाबत काहीसा सूर आळवला जात असून, विलंबाबद्दल प्रशासकीय कारभारावर चर्चा झडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
​स्थायी समितीच्या ६ डिसेंबर १९६१च्या ठराव क्रमांक २२५० नुसार पालिकेच्या सर्व अर्थसंकल्पांमधील शिल्लक रकमेचा तिमाही अहवाल नियमितपणे समितीला सादर करणे अपेक्षित असते, मात्र प्रमुख लेखापाल (वित्त) यांनी ३१ मार्च २०२६ पर्यंतचा हा अहवाल १ ऑक्टोबरला आयुक्तांच्या स्वाक्षरीने चिटणीस कार्यालयाकडे पाठवला. सहा महिन्यांत शहरात पावसाळापूर्व कामे, रस्ते काँक्रीटीकरण आणि विविध पायाभूत सुविधांवर मोठा खर्च झाला असल्याने, हा जुना हिशेब नेमका कसा उपयोगी पडणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
या अहवालानुसार ३१ मार्च २०२६ अखेर पालिकेच्या तिजोरीत बँक ठेवी आणि कर्जरोख्यांच्या स्वरूपात तब्बल ८६ हजार ९०५ कोटी ९९ लाख रुपयांची गंगाजळी शिल्लक असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
​अर्थसंकल्प ‘अ’, ‘ब’ आणि ‘ई’ अंतर्गत ५३ हजार ५६६ कोटी रुपये (८,९६० कोटींच्या मनपा कर्जरोख्यांसह).​ पाणीपुरवठा व मलनिस्सारण (अर्थसंकल्प ‘ग’) अंतर्गत २३ हजार ५७४ कोटी रुपये,​ वृक्ष प्राधिकरण निधीत ७६३ कोटी ८२ लाख रुपये आणि प्राथमिक शिक्षणासाठी ४६८ कोटी ५४ लाख रुपये,​ विशेष प्रकल्पांसाठी एक हजार ३३ कोटी रुपये, मालमत्ता पुनर्स्थापना व पुनर्वसन निधीत सात हजार ४५७ कोटी रुपये, तर आकस्मिकता निधीत ३२४ कोटी रुपये शिल्लक आहेत. ​हा हिशेब सहा महिने जुना असल्याने आणि यादरम्यान विकासकामांचा निधी खर्च झाल्यामुळे, तिजोरीतील नेमक्या सध्याच्या स्थितीबाबत आगामी बैठकीत सदस्यांकडून सविस्तर विचारणा होण्याची दाट शक्यता आहे.
........

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com