

मोठं घर मिळालं, पण पाण्याची समस्या कायम!
नायगाव बीडीडीवासीयांचा संताप; कमी दाबाने पाणीपुरवठा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १४ : बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या माध्यमातून म्हाडाने आतापर्यंत १,४०१ नायगाव बीडीडीवासीयांना तब्बल ५०० चौरस फुटांचे घर दिले असले तरी रहिवाशांमध्ये अपुऱ्या पाणी पुरवठ्यामुळे तीव्र नाराजी आहे. मोठं घर मिळालं, पण चाळीप्रमाणेच येथेही पाण्याची समस्या कायम आहे. इमारतींना अपुरा पाणीपुरवठा होत असल्याने घरात गरजेच्या तुलनेत निम्मेच पाणी येते. त्यामुळे मोठं घर असूनही गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याची खंत रहिवाशांकडून व्यक्त केली जात आहे.
बीडीडी चाळ हा राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी पुनर्विकास प्रकल्प आहे. त्यानुसार म्हाडाने नायगाव येथे २३ मजली गगनचुंबी पुनर्वसन इमारती उभारल्या असून, गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर १६ मे मार्चला ८६४ तर ५ जूनला ५३७ रहिवाशांना आठ इमारतींमधील घरांचा ताबा दिला आहे. सुरुवातीला येथे पुरेसे पाणी उपलब्ध होत होते. पण गेल्या दीड-दोन महिन्यांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने सकाळी अर्धा-पाऊण तास पाणी उपलब्ध होत असल्याने रहिवासी हैराण झाले आहेत. नायगाव बीडीडीच्या पहिल्या टप्प्यातील आठ इमारतींना दररोज सुमारे ९-१० लाख लिटर पाण्याची आवश्यकता आहे. या पाणीपुरवठ्यासाठी नवीन लाईन टाकावी लागणार आहे. तोपर्यंत सहा लाख ४० हजार लिटर पाणीपुरवठ्याचे आश्वासन पालिकेने दिले होते, मात्र तेवढेही पाणी उपलब्ध होत नसल्याने रहिवाशांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याचे लक्ष्मण सिंग या रहिवाशाने सांगितले.
जेट स्प्रे आहे, पण पाणी नाही
म्हाडाने उभारलेल्या घरांत अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. सर्वच सदनिकांमध्ये कमोड टॉयलेटची व्यवस्था केली आहे. त्यासाठीच्या फ्लशसाठी ट्रीटमेंट केलेले पाणी असते, पण तेथे असलेल्या जेट स्प्रेला अनेकदा पाणी नसते. त्यामुळे आधुनिक सुविधा असूनही उपयोग नाही, अशी खंत गजेंद्र धुमाळे या रहिवाशाने व्यक्त केली.
कुटुंबातील सदस्यांची संख्या जास्त
सध्या बीडीडीवासीयांना एका कुटुंबात पाच सदस्य याप्रमाणे पाणीपुरवठा होतो. मात्र येथे वास्तव्यास असलेल्या कुटुंबात आठ-दहा सदस्य आहेत. त्यामुळे त्यांना पाणी पुरत नाही. याची दखल घेत म्हाडा आणि पालिकेने अतिरिक्त पाणीपुरवठा कसा होईल याची व्यवस्था करावी. नवीन जलवाहिनी टाकावी, अशी मागणी रहिवाशांकडून होत आहे.
एकच जलवाहिनी असल्याने कमी दाब
बीडीडी चाळीला होणारा पाणीपुरवठा हा गोविंदजी केणी मार्गावरील जलवाहिनीतून होतो. मात्र आमच्या इमारती आधी असलेल्या भोईवाडा, अपना बाजार, महात्मा फुले कॉर्नर येथील इमारतीलाही याच जलवाहिनीतून पाणी जाते. त्यामुळे बीडीडीच्या इमारतीपर्यंत पाणी विभागले जात असल्याने कमी दाबाने पुरवठा होत असल्याने ही समस्या निर्माण झाल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे.
आम्ही हायफाय घरात राहत असूनही अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे जुन्या चाळीतील अपुऱ्या पाण्याच्या आठवणी जाग्या होतात. घरात टाकी लावण्यास परवानगी नसल्याने चाळीप्रमाणे निळ्या ड्रमात पाणी साठवून ठेवावे लागते. पाणी समस्येवर कायसमवरूपी तोडगा काढायला हवा.
- गजेंद्र धुमाळे, रहिवासी
बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प हा राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असतानाही येथे पुरेसे पाणी न मिळणे हे धक्कादायक आहे. त्यामुळे म्हाडा आणि पालिकेने आवश्यक इन्फ्रास्ट्रक्चर उभारून आम्हाला पुरेसे पाणी द्यावे.
- लक्ष्मण सिंग, रहिवासी
आम्हाला सकाळी केवळ अर्धा तास पाणी येते, त्यावर दिवस कसा काढावा हा प्रश्न पडतो. टॉयलेटमध्ये असलेल्या जेट स्प्रेला पाणी नसते. याची दखल घेऊन या इमारतीसाठी स्वतंत्र लाइन टाकून पाणीपुरवठा व्हायला हवा.
- विशाल मोहिते, रहिवासी
नायगाव बीडीडीवासीयांच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आम्ही अतिरिक्त जलजोडणी आणि वाढीव पाणीपुरवठ्यासाठी मुंबई महापालिकेशी चर्चा करीत असून, त्यावर लवकरच तोडगा निघेल. दरम्यान, रहिवाशांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा.
- मिलिंद बोरीकर, मुख्य अधिकारी, मुंबई मंडळ (म्हाडा)
-------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.