

औषध तपासण्यांना वेग
१९ कोटींचा औषधसाठा जप्त; १४ जणांना अटक
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १४ : राज्यात बनावट, निकृष्ट आणि विनापरवाना औषधांच्या विक्रीला आळा घालण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) तपासणी मोहीम अधिक तीव्र केली आहे. एप्रिल-मेच्या तुलनेत जून ते सप्टेंबर महिन्यांत औषध उत्पादन आणि विक्री आस्थापनांच्या तपासण्यांची मासिक सरासरी ४.६ पट वाढली आहे. यात ४,२५६ तपासण्या करण्यात आल्या असून, सुमारे १९.११ कोटी रुपयांचा औषधसाठा जप्त किंवा प्रतिबंधित करण्यात आला आहे. याप्रकरणी ३३ गुन्हे दाखल करून १४ जणांना अटक करण्यात आली आहे.
एप्रिल आणि मे या महिन्यात औषध उत्पादन व विक्री आस्थापनांच्या मिळून ४६७ तपासण्या झाल्या होत्या. त्यांची मासिक सरासरी २३४ होती. जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत ४,२५६ तपासण्या झाल्याने ही सरासरी १,०६४ वर पोहोचली. तपासणीचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे प्रमाणही २९ टक्क्यांवरून १३१ टक्क्यांपर्यंत वाढले आहे.
१,१४४ नियामक कारवाया
तपासण्यांबरोबरच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांविरुद्ध कारवाईचा बडगाही उगारण्यात आला आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत १,४०२ नोटिसा बजावण्यात आल्या. २८८ परवाने रद्द, तर ८५६ परवाने निलंबित करण्यात आले. उत्पादन आणि विक्री आस्थापनांविरुद्ध एकूण १,१४४ नियामक कारवाया करण्यात आल्या.
विनापरवाना विक्रीची ४३ प्रकरणे
औषधांच्या बेकायदा व्यवहारांवर कारवाई करताना चार महिन्यांत ११५ शोध व जप्तीच्या कारवाया करण्यात आल्या. विनापरवाना औषधसाठा आणि विक्रीची ४३ प्रकरणे उघडकीस आली. आक्षेपार्ह जाहिरातींची ३१, बनावट औषधे व सौंदर्यप्रसाधनांची १४, तर चुकीचे ब्रँडिंग असलेल्या सौंदर्यप्रसाधनांची १० प्रकरणे समोर आली. गुंगीकारक औषधांच्या गैरवापराप्रकरणी एनडीपीएस कायद्यांतर्गत नऊ कारवाया करण्यात आल्या. वैद्यकीय उपकरणे, फसव्या साधर्म्याची ब्रँड नावे आणि लेबलविषयक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवरही कारवाई करण्यात आली.
़़़़
बनावट, निकृष्ट आणि विनापरवाना औषधांचा बाजारात शिरकाव रोखण्यासाठी राज्यभर तपासणी मोहीम अधिक व्यापक करण्यात येणार आहे. दोषींविरुद्ध कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल.
़ तुकाराम मुंढे, आयुक्त, अन्न व औषध प्रशासन
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.