

‘आश्रय’च्या खर्चात ९३ कोटींची वाढ!
विरोधकांचा गदारोळ; स्थायी समितीत प्रस्ताव मंजूर
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १४ : सफाई कामगारांसाठी राबवण्यात येणाऱ्या ‘आश्रय योजने’अंतर्गत पुनर्विकास प्रस्तावाच्या खर्चात तब्बल ९३ कोटी रुपयांची घसघशीत वाढ झाली आहे. यावरून पालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत विरोधकांनी जोरदार गदारोळ केला. अधिकाऱ्यांच्या बेजबाबदार कारभारावर आणि आर्किटेक्टच्या भूमिकेवर सर्वपक्षीय नगरसेवकांनी आक्षेप नोंदवले. गदारोळातच हा प्रस्ताव स्थायी समितीचे अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी अखेर मंजूर केला.
शिवसेना (शिंदे गट) यामिनी जाधव म्हणाल्या, की प्रस्तावात इतक्या मोठ्या प्रमाणावर खर्च वाढणे अत्यंत आक्षेपार्ह आहे. सर्व बाबींची पूर्तता झाली आहे की नाही, हे तपासूनच निर्णय घ्यायला हवा. तर भाजपच्या शीतल गंभीर व प्रकाश दरेकर यांनी आक्षेप नोंदवताना नाराजी व्यक्त केली. आर्किटेक्टने नवीन बाबी सुचवल्याने खर्च वाढल्याचे सांगितले जात आहे; मग या बाबी आधीच का तपासल्या नाहीत, असा सवाल शीतल गंभीर यांनी केला. तर प्रकाश दरेकर यांनी सफाई कामगारांच्या घरांचा पुनर्विकास लवकरात लवकर होणे गरजेचे असल्याचे स्पष्ट केले. तर मनसेचे नगरसेवक यशवंत किल्लेदार म्हणाले, की तिसऱ्यांदा हा प्रस्ताव आला आहे. अधिकारी मुद्दाम अशा चुका करून खर्च वाढवतात का, याबाबत प्रशासनाला जाब विचारलाच पाहिजे. एमआयएमच्या जमीर कुरेशी यांनीदेखील विरोध केला. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) नगरसेविका डॉ. सईदा खान म्हणाल्या, की प्रकल्पाचा खर्च नेमका का वाढला आणि यामागे कोणत्या अतिरिक्त सुविधा दिल्या जाणार आहेत, याचे स्पष्टीकरण प्रशासनाने दिले पाहिजे. तर काँग्रेसचे गटनेते अशरफ आजमी यांनीदेखील या विषयावरून प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. शिवसेना (ठाकरे गट) नगरसेविका श्रद्धा जाधव, लक्ष्मी भाटिया व मीनाक्षी पाटणकर यांनीही या प्रस्तावाला विरोध केला.
प्रशासनाचे स्पष्टीकरण
पालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी प्रशासनाची बाजू मांडली. नियमावलीतील बदलांमुळे हा वाढीव खर्च दिसत असून, यामध्ये काहीही गैर किंवा अनियमितता नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.