

फक्त वरळी समुद्रकिनाऱ्याची स्वच्छता का?
स्थायी समितीत विरोधकांचा गदारोळ; प्रस्ताव मंजूर
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १४ : मुंबईतील समुद्रकिनाऱ्यांच्या स्वच्छतेवरून महापालिकेच्या स्थायी समितीत विरोधकांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. जी/दक्षिण विभागातील वरळी कोळीवाडा समुद्रकिनाऱ्याच्या दोन वर्षांच्या स्वच्छतेसाठी तीन कोटी १५ लाख ५७ हजार ८९७ रुपयांचा प्रस्ताव बहुमताच्या जोरावर मंजूर करण्यात आला. यावर ‘‘फक्त वरळी किनाऱ्यावरच प्रशासनाची मेहेरबानी का? इतर कोळीवाडे आणि किनाऱ्यांकडे दुर्लक्ष का?’’ असे सवाल करीत सर्वपक्षीय नगरसेवकांनी बैठकीत जोरदार गोंधळ घातला.
काँग्रेसचे गटनेते अशरफ आझमी यांनी प्रशासनावर तोफ डागताना म्हटले, ‘‘माहीम, कुलाबा यांसारख्या सर्व कोळीवाड्यांचे प्रस्ताव एकत्र आणायला हवेत. सफाईचे अर्धे काम स्थानिक कोळी समाजाला दिल्यास त्यांच्या हाताला काम मिळेल.’’ शिवसेना ठाकरे गटाच्या नगरसेविका श्रद्धा जाधव आणि यशोधर फणसे यांनीही प्रशासनावर चांगलीच आगपाखड केली. वर्सोवासह मुंबईतील किती किनाऱ्यांवर अशी स्वच्छता केली जाणार? कचऱ्याचे साम्राज्य असूनही प्रशासन दुर्लक्ष करीत आहे, असा आरोप करण्यात आला. तसेच मनसेचे नगरसेवक यशवंत किल्लेदार म्हणाले, ‘‘वरळी किनाऱ्यावर अवैध झोपड्या आणि अतिक्रमणे झाली आहेत. ओला-सुका कचरा मोजमापाची कोणतीही पारदर्शक पद्धत नाही.’’ शिवसेना शिंदे गटाच्या यामिनी जाधव आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या डॉ. सईदा खान यांनी पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित करीत ‘‘पर्यटनाच्या दृष्टीने चेंजिंग रूम, लॉकर्स देणे गरजेचे आहे. तसेच उचललेला कचरा नक्की कुठे टाकला जातो, हे तपासावे,’’ असे म्हटले.
पर्यटनाला चालना देण्याचे निर्देश
विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना अतिरिक्त आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे म्हणाले, ‘‘किनाऱ्यांवर स्वच्छतेसाठी आधुनिक मशीन दिल्या असून, तक्रारी असलेल्या ठिकाणी आढावा घेऊन सर्व सुविधा पुरवल्या जातील.’’ अखेर स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी किनाऱ्यांवरील अतिक्रमणे हटवून पर्यटनाला चालना देण्याचे निर्देश देत मे. लक्ष्य एंटरप्राईजेस या ठेकेदाराला ३.१५ कोटींचे काम देणारा हा प्रस्ताव मंजूर केला.
........
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.