

टँकरवरून तंटा
विरोधकांसह सत्ताधाऱ्यांनीही प्रशासनाला धारेवर धरले
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १४ : महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत आज टँकरद्वारे होणाऱ्या पाणीपुरवठ्याचा विषय चांगलाच तापला. टँकरमाफियांच्या मनमानी कारभाराविरोधात राळ उठवत विरोधकांसह सत्ताधारी पक्षांच्या नगरसेवकांनीही टँकरचालकांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि पालिका प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले.
पालिकेचेच पाणी भरून टँकरचालक सर्वसामान्यांना चार ते पाच हजार रुपयांना विकत असल्याचा गंभीर आरोप बैठकीत करण्यात आला. प्रस्तावावर झालेल्या चर्चेदरम्यान शिवसेना (ठाकरे गट) नगरसेवक यशोधर फणसे व श्रद्धा जाधव यांनी टँकरमाफियांच्या तक्रारींचा चौकशी अहवाल आधी देण्याची मागणी केली. शिवसेना (शिंदे गट) नगरसेविका यामिनी जाधव यांनी, पालिकेच्या मुख्य लाइनवरून टँकर भरून तेच पाणी नागरिकांना विकले जात असल्याचा आरोप केला. एमआयएमचे जमीर कुरेशी व काँग्रेसच्या अजंठा यादव यांनी पालिकेने स्वतःचे टँकर न वापरता भाड्याने टँकर का घेतले, असा जाब विचारला.
भाजप नगरसेवक तेजिंदर तिवाना, शीतल गंभीर, मकरंद नार्वेकर व प्रीती साटम यांनी जल अभियंत्यांचा विषय असताना मलनिस्सारण विभागाचा काय संबंध, असा प्रश्न करत, जीपीएस आणि ओटीपी प्रणाली कडक करण्याची मागणी केली. राष्ट्रवादीच्या डॉ. सईदा खान व मनसेचे यशवंत किल्लेदार यांनी टँकरमाफियांवर नियंत्रणाची मागणी केली, तर गणेश खणकर यांनी बांधकाम व्यवसायासाठी प्रक्रिया केलेले पाणी वापरणे बंधनकारक करण्याची सूचना केली.
या सर्व टीकेनंतर महापालिका अतिरिक्त आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी सांगितले की, सध्या पालिकेकडे ३७ टँकर असून, २४ नवीन टँकर घेतले जात आहेत. चोरी रोखण्यासाठी ओटीपी आणि जीपीएस यंत्रणा लागू करण्यात आली असून, बांधकामासाठीच्या पाणी वापरावर नवीन धोरण आखले जाईल, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. प्रशासनाच्या या स्पष्टीकरणानंतर हा प्रस्ताव अखेर मंजूर करण्यात आला.
......
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.