काळू धरणावरील स्थगिती उठवली

काळू धरणावरील स्थगिती उठवली
Published on: 

काळू धरणाच्या कामावरील स्थगिती उठवली

४,९०० कोटींच्या प्रकल्पासाठी नव्‍या निविदेस उच्च न्यायालयाची परवानगी

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १४ : जवळपास १० वर्षांपासून काळू धरण प्रकल्पाच्या कामाला दिलेली अंतरिम स्थगिती उच्च न्यायालयाने बुधवारी (ता. १४) उठवली. न्यायालयाच्या या निर्णयामुळे प्रकल्पाच्या कामासाठी नव्याने निविदा काढण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या नव्या निविदा प्रक्रियेत मूळ याचिकाकर्त्या एफ.ए. एंटरप्रायझेससह अन्य इच्छुकांना सहभागी होता येईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

एफ. ए. एंटरप्रायझेसला देण्यात आलेले कंत्राट रद्द करण्यासंबंधीच्या नोटिशीला कंपनीने २०१७ मध्ये उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यापूर्वी ७ डिसेंबर २०१६ राेजी न्यायालयाने अंतरिम आदेश दिला होता. संबंधित कंत्राट अन्य कोणत्याही पक्षाला देऊ नये, असे आदेश दिले होते. हा आदेश जवळपास १० वर्षे कायम होता. परिणामी, धरणाच्या बांधकामाचे काम रखडले होते. न्यायालयाने ९ जानेवारी २०२६ रोजीच्या आदेशात संबंधित प्रकल्पात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) चौकशीत काही आक्षेपार्ह बाबी आढळल्या होत्या का, याबाबत राज्य सरकारला अतिरिक्त प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितले होते.
दरम्यान, याच याचिकाकर्त्या कंपनीच्या अन्य संबंधित याचिकांत ८ जून २०२१ रोजी उच्च न्यायालयाने कोकण पाटबंधारे विकास महामंडळाला योग्य प्रक्रिया राबवून मूळ याचिकाकर्त्यामार्फत किंवा अन्य इच्छुक पक्षामार्फत प्रकल्प पूर्ण करण्याची मुभा दिली होती. एसीबीच्या अहवालात प्रकल्पाच्या अंमलबजावणीत भ्रष्टाचार, गंभीर अनियमितता किंवा बेकायदा कृत्ये आढळली नसल्याचे महामंडळाने म्हटले होते. या प्रकरणातही तसाच दिलासा देण्याची मागणी महामंडळाने केली; मात्र याचिकाकर्त्याने त्याला विरोध केला. वन विभागाच्या परवानग्या मिळवण्याची जबाबदारी नेमकी कोणाची होती, यावर दोन्ही बाजूंमध्ये मतभेद होते. यासंबंधीच्या वादात पडणार नसल्याचे न्या. पितळे आणि न्या. दुभाश यांच्या खंडपीठाने आदेशात स्पष्ट केले. संबंधित प्रकल्पाबाबत अन्य मुद्द्यांवर सुनावणी आवश्यक असल्याचा याचिकाकर्त्याचा युक्तिवाद लक्षात घेऊन न्यायालयाने मूळ याचिका निकाली न काढता केवळ अंतरिम स्थगिती उठवली. त्यामुळे महामंडळाला नव्याने निविदा प्रक्रिया राबवता येणार असून, सर्व इच्छुक पक्षांना त्यात सहभागी होता येणार आहे.

खर्च वाढून ४,९०० कोटी रुपयांवर
प्रकल्पाला न्यायालयाने याआधी २०१६ मध्ये दिलेल्या स्थगितीवेळी प्रकल्पाचा अंदाजित खर्च ६५७ कोटी रुपये होता. आता तो वाढून सुमारे ४,९०० कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com