

कुर्ला-ट्रॉम्बेतील ३,७६२ झोपड्यांवर कारवाई
रेल्वेकडून नोटिसा; घरे रिकामी करण्यासाठी ३० दिवसांची मुदत
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ : कुर्ला-ट्रॉम्बे रेल्वे मार्गालगत असलेल्या ३,७६२ झोपड्या हटविण्याची प्रक्रिया मध्य रेल्वेकडून पुन्हा सुरू होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर रेल्वे प्रशासन या आठवड्यात संबंधित रहिवाशांना निष्कासनाच्या नव्या नोटिसा बजावणार आहे. नोटीस मिळाल्यानंतर घरे रिकामी करण्यासाठी ३० दिवसांची मुदत दिली जाणार आहे. रेल्वेच्या सुरक्षिततेसह प्रस्तावित मार्गविस्तारासाठी ही जागा आवश्यक असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.
कुर्ला-ट्रॉम्बे रेल्वे मार्गालगत रेल्वेच्या सुमारे नऊ हजार चौरस मीटर जागेवर या झोपड्या उभारण्यात आल्या आहेत. या मार्गाचा प्रामुख्याने मालगाड्यांच्या वाहतुकीसाठी वापर होतो. मुंबईच्या पूर्व उपनगरांतील औद्योगिक क्षेत्रे आणि पेट्रोलियम आस्थापनांपर्यंत माल पोहोचविण्यासाठी हा मार्ग महत्त्वाचा आहे. रेल्वेरूळ आणि विद्युत तारांजवळील बांधकामांमुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत असल्याचे रेल्वे प्रशासनाने म्हटले आहे.
पाचव्या-सहाव्या मार्गासाठी जागा आवश्यक
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कुर्ला यादरम्यान पाचव्या आणि सहाव्या रेल्वे मार्गाच्या प्रस्तावित विस्तारासाठीही या जागेची आवश्यकता आहे. त्यामुळे रेल्वेच्या जागेवरील अनधिकृत बांधकामे हटविण्याच्या प्रक्रियेला वेग येणार आहे.
उच्च न्यायालयाचे पुनर्वसनाचे निर्देश
सात बाधित रहिवाशांनी दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाने रेल्वेला नव्याने नोटिसा बजावण्याचे निर्देश दिले आहेत. यापूर्वी २०२२ मध्ये रहिवाशांना कारणे दाखवा नोटिसा देण्यात आल्या होत्या. आता निष्कासनाची प्रक्रिया पुन्हा सुरू होणार आहे. बाधित रहिवाशांच्या पुनर्वसनाचा विचार करण्याबरोबरच संबंधित कुटुंबांना सहा महिन्यांपर्यंत दरमहा दोन हजार रुपयांची अंतरिम आर्थिक मदत देण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत.
क्रेन दुर्घटनेने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
कुर्ल्यातील कुरेशीनगर परिसरात २१ ऑगस्टला २५० टन वजनाची हायड्रॉलिक क्रेन झोपड्यांवर कोसळली होती. जीर्ण इमारत पाडण्यासाठी वापरण्यात येत असलेल्या क्रेनच्या दुर्घटनेत १० जण जखमी झाले होते. अनेक घरांचे नुकसान झाले, तर विद्युत ताराही तुटल्या होत्या. या घटनेनंतर परिसरातील बांधकामांमुळे निर्माण होणाऱ्या सुरक्षेच्या प्रश्नाकडे पुन्हा लक्ष वेधले गेले.
गरीबनगरनंतर कुर्ला-ट्रॉम्बेवर लक्ष
याच वर्षाच्या सुरुवातीला वांद्रे येथील गरीबनगर परिसरात रेल्वे विस्तारासाठी ५०० हून अधिक अनधिकृत बांधकामे हटविण्यात आली होती. त्यातील पुनर्वसनासाठी पात्र ठरलेल्या सुमारे १०० कुटुंबांना मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) घरे देण्यात आली होती. आता कुर्ला-ट्रॉम्बे परिसरातील झोपड्यांवर होणाऱ्या कारवाईकडे बाधित कुटुंबांचे लक्ष लागले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.