

मानवी तस्करीचे संपूर्ण जाळे उघड करा : दाते
नेटवर्क केंद्रित तपासावर भर देण्याच्या पोलिसांना सूचना
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ : मानवी तस्करीच्या गुन्ह्यांचा तपास केवळ एका आरोपीला पकडण्यापुरता मर्यादित न ठेवता त्यामागील संपूर्ण जाळे उघड करण्यावर भर द्यावा. त्यासाठी ‘बॅकवर्ड अँड फॉरवर्ड लिंकेजेस’ शोधून नेटवर्क केंद्रित तपास करावा, असे निर्देश राज्याचे पोलिस महासंचालक सदानंद दाते यांनी गुरुवारी दिले.
महाराष्ट्र पोलिस दल आणि प्रकृती संस्थेच्या संयुक्त विद्यमाने पोलिस महासंचालक कार्यालयात आयोजित ‘न्यायसेतू २०२६’ या मानवी तस्करीच्या गुन्ह्यांबाबतच्या राज्यस्तरीय कार्यशाळेत दाते बोलत होते. माजी पोलिस महासंचालक डॉ. पी. एम. नायर, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिव नंदिनी आवडे, अतिरिक्त पोलिस महासंचालक (महिला व बालकांवरील अपराध प्रतिबंध) अस्वती दोरजे आणि विशेष पोलिस महानिरीक्षक शारदा राऊत उपस्थित होते.
तंत्रज्ञान वेगाने बदलत असून, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात गुन्ह्यांचे नवे स्वरूप समोर येऊ शकते. त्यामुळे पोलिसांनी या बदलांविषयी सजग राहून प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर द्यावा. गुन्हा घडल्यास त्याची तातडीने उकल करून गुणवत्तापूर्ण तपास करावा. तपासादरम्यान पीडितांची परिस्थिती समजून घेत त्यांना आधार मिळेल, असे वर्तन ठेवावे, असे दाते म्हणाले. पीडितांची ओळख सुरक्षित ठेवून साक्ष नोंदविणे तसेच ‘इन-कॅमेरा’ सुनावणीसारख्या तरतुदींची प्रभावी अंमलबजावणी करण्याची सूचनाही त्यांनी केली. पीडितांना वैद्यकीय मदत, दुभाष्याची सुविधा आणि मानसिक समुपदेशन मिळवून देण्यासाठी पोलिसांनी विविध यंत्रणांमध्ये दुवा म्हणून काम करावे, असेही त्यांनी सांगितले.
अधिकाऱ्यांना सक्षम करणे हा उद्देश
अतिरिक्त पोलिस महासंचालक अस्वती दोरजे यांनी मानवी तस्करीच्या गुन्ह्यांतील आर्थिक व्यवहार, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि विविध शासकीय विभागांमधील समन्वयाबाबत अधिकाऱ्यांना सक्षम करणे हा कार्यशाळेचा उद्देश असल्याचे सांगितले. कार्यशाळेत कायदेशीर तरतुदी, न्यायालयीन निवाडे आणि भारतीय न्याय संहितेतील उपाययोजनांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.