सीजेपीची आता ‘हर शहर जंतर-मंतर’ मोहीम

सीजेपीची आता ‘हर शहर जंतर-मंतर’ मोहीम
Published on: 

सीजेपीची आता ‘हर शहर जंतरमंतर’ मोहीम
नेत्यांच्या अटकेविरोधात शिवाजी पार्कमध्ये तिरंगा
मुंबई, ता. १५ : जंतरमंतर येथे राष्ट्रध्वज फडकवल्याप्रकरणी ‘कॉक्रोच जनता पार्टी’च्या (सीजेपी) आशुतोष रांका आणि सौरव दास यांना अटक झाल्यानंतर सीजेपीने आता ‘हर शहर जंतरमंतर’ मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत नागरिकांना विविध ठिकाणी तिरंगा फडकवून त्याचे छायाचित्र किंवा व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसिद्ध करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, या अटकेच्या निषेधार्थ मुंबईतील विविध विद्यार्थी संघटनांच्या प्रतिनिधींनी शिवाजी पार्क येथे तिरंगा फडकवून दोन्ही नेत्यांच्या सुटकेची मागणी केली.

सीजेपीने ‘#HarShaharJantarMantar’ या हॅशटॅगसह ही मोहीम सुरू केली आहे. घर, महाविद्यालय, कार्यालय तसेच सार्वजनिक ठिकाणी तिरंगा फडकवून मोहिमेला पाठिंबा देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुंबईत बुधवारी (ता. १४) पुरोगामी विद्यार्थी संघटनेच्या साम्या कोरडे, सीजेपीचे कुणाल करमेकर आणि साहिल पारसेकर, छात्रभारतीचे चेतन पाटील, ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनचे आमीर काझी आणि व्यंगचित्रकार गौरव सर्जेराव यांनी शिवाजी पार्कमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर तिरंगा फडकवला. रांका आणि दास यांच्या अटकेविरोधात एकजूट व्यक्त करण्यासाठी ही कृती केल्याचे संघटनांनी सांगितले. आंदोलन करण्याच्या अधिकारावर निर्बंध आणले जात असल्याचा आरोपही विद्यार्थी संघटनांनी केला. आंदोलनांना परवानगी नाकारणे, गुन्हे दाखल करणे किंवा ताब्यात घेण्याच्या कारवाईमुळे विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्तीच्या अधिकारावर मर्यादा येत असल्याचा दावा त्यांनी केला.

आज गेटवेवर आंदोलन
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या राजीनाम्यासह विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) प्रक्रिया रद्द करावी आणि निवडणूक आयोगाशी संबंधित २०२३ चा कायदा रद्द करावा, अशा मागण्या संघटनांनी केल्या आहेत. रांका आणि दास यांच्या सुटकेच्या मागणीसाठी १६ ऑक्टोबरला गेटवे ऑफ इंडिया येथे आंदोलन करण्यात येणार असल्याचेही संघटनांकडून सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com