

सुट्या मसाल्यांच्या विक्रीवर बंदी
भेसळीविरोधात एफडीए आक्रमक
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ : मसाल्यांमधील भेसळ आणि अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन रोखण्यासाठी महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासनाने व्यापक अनुपालन आदेश जारी केला असून, मसाल्यांची पूड आणि मिश्रित मसाल्यांची उघड्यावर तसेच पॅकेजिंगशिवाय विक्री करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आज ही माहिती दिली.
या आदेशानुसार मसाल्यांचे उत्पादन, प्रक्रिया, साठवणूक, पॅकेजिंग, वाहतूक आणि विक्रीशी संबंधित सर्व व्यावसायिकांना अन्नसुरक्षा नियमांचे पालन करणे बंधनकारक असेल. यामध्ये मसाला उत्पादक, घाऊक व किरकोळ विक्रेते, ई-कॉमर्स कंपन्या, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि केटरर्स यांचाही समावेश आहे. मुंढे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मसाल्यांमध्ये प्रतिबंधित कृत्रिम रंग, निकृष्ट दर्जाचा कच्चा माल आणि इतर भेसळयुक्त पदार्थांचा वापर केल्याने ग्राहकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. बाजारात सुरक्षित, भेसळमुक्त आणि दर्जेदार मसाले उपलब्ध व्हावेत हा या आदेशामागील मुख्य उद्देश आहे. या आदेशाची अंमलबजावणी सुरू झाली आहे.
...
आदेशात काय?
- मेटानिल येलो, रोडामाइन बी, सुदान डाई आणि लेड क्रोमेट यांसारख्या प्रतिबंधित रंगांच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे.
- मसाल्यांचे वजन वाढवण्यासाठी विटांची पूड, खडूची पूड, लाकडाचा भुसा, अनधिकृत स्टार्च किंवा अन्य बाह्य पदार्थ मिसळल्यास संबंधितांवर कारवाई केली जाणार आहे.
- निकृष्ट दर्जाचे मसाले चांगल्या दर्जाच्या मसाल्यांमध्ये मिसळून विकणे आणि अर्क काढून घेतलेल्या मसाल्यांची विक्री करणे यावरही प्रतिबंध घालण्यात आला आहे.
- मसाले सार्वजनिक रस्त्यांवर, डांबरी पृष्ठभागावर, गटारांजवळ, कचराकुंड्यांच्या परिसरात किंवा जनावरांच्या गोठ्यांजवळ वाळवण्यास मनाई करण्यात आली आहे. मसाल्यांचे उत्पादन आणि साठवणूक करणारी ठिकाणे स्वच्छ, कोरडी, कीटकमुक्त आणि दूषित पदार्थांपासून सुरक्षित असणे आवश्यक आहे.
- मसाल्यांच्या साठवणुकीच्या ठिकाणी रसायने, कीटकनाशके आणि औद्योगिक रंग ठेवण्यासही बंदी घालण्यात आली आहे.
- मसाल्यांची पूड आणि मिश्रित मसाल्यांची उघड्यावर तसेच पॅकेजिंगशिवाय विक्री करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. मसाल्यांचे पॅकेजिंग आणि सीलबंद करण्याची प्रक्रिया उत्पादनाच्या ठिकाणी योग्य पद्धतीने करणे बंधनकारक असेल.
- प्रत्येक पाकिटावर उत्पादनाचे नाव, घटकांची माहिती, उत्पादकाचा तपशील, एफएसएसआय परवाना क्रमांक, बॅच क्रमांक, उत्पादन किंवा पॅकिंगची तारीख आणि लागू नियमांनुसार अंतिम वापराची तारीख अथवा ‘बेस्ट बिफोर’ची माहिती नमूद करणे आवश्यक असेल.
- मसाल्यांचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी इथिलीन ऑक्साइडचा वापर करण्यास मनाई करण्यात आली आहे. याशिवाय मसाल्यांमधील कीटकनाशकांचे अवशेष, अफ्लाटॉक्सिन, जड धातू आणि इतर दूषित घटकांची निर्धारित मानकांनुसार तपासणी केली जाणार आहे.
- अन्न व्यवसायाशी संबंधित सर्व व्यावसायिकांकडे वैध परवाना असणे, कर्मचाऱ्यांच्या स्वच्छतेची काळजी घेणे आणि त्यांना आवश्यक प्रशिक्षण देणेही बंधनकारक करण्यात आले आहे.
...
दंड असा
भ्रामक जाहिरातींसाठी - १० लाख रुपयांपर्यंत दंड.
चुकीच्या लेबलिंगसाठी - ३ लाख रुपयांपर्यंत दंड.
निकृष्ट दर्जाच्या अन्नपदार्थांसाठी - ५ लाख रुपयांपर्यंत दंड.
(असुरक्षित अन्नपदार्थांशी संबंधित प्रकरणांमध्ये गुन्ह्याचे स्वरूप आणि त्यामुळे झालेल्या नुकसानीनुसार कारावास तसेच दंडाची शिक्षा होऊ शकते.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.